सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा ; शुल्क भरण्यास पर्याय देण्याचे संस्थांना निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 06:44 PM2020-07-19T18:44:07+5:302020-07-19T18:47:49+5:30
ज्या अभ्यासक्रम शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येते अशा अभ्यासक्रमांचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे शासन प्रतिपूर्ती नसलेल्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून एकत्रित शुल्क न आकारता, त्यांना शुल्क भरण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना केल्या आहेत.
नाशिक : शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांसह मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शिक्षण संस्थांना ज्या अभ्यासक्रम शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येते अशा अभ्यासक्रमांचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे शासन प्रतिपूर्ती नसलेल्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून एकत्रित शुल्क न आकारता, त्यांना शुल्क भरण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सूचना सावित्रीबाई फुलेपुणेविद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना केल्या आहेत.
सावित्रीबाई फुलेपुणेविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी विद्यार्थांकडे एक रकमी शुल्क वसुलीसाठी तगादा न लावता दोन ते तीन सुलभ हप्त्यात शुल्क भरण्यासाठी मुभा द्यावी, असे आदेश विद्यापीठातर्फे देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क जमा करा, अन्यथा प्रवेश मिळणार नाही अशा अटी घातल्याने विद्यार्थ्यांनी संस्थांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे पुणे विद्यापीठाने कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक एक रकमी घेऊ नये, शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असा सूचना केल्या आहेत.
करोना लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी व पालक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना एक रकमी शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नाही. सध्याची आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा पाहता विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याबाबत पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असेही विद्यापीठाने सर्व संलग्नित संस्थांसाठी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाच्या उपकुलसचिवांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.