येवलेकरांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:33 PM2020-05-08T22:33:04+5:302020-05-09T00:07:20+5:30
येवला : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासकीय यंत्रणा अधिक सजग झाली आहे. येवला तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ झाली आहे. तर आजपर्यंत एकूण ९४ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
येवला : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासकीय यंत्रणा अधिक सजग झाली आहे. येवला तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ झाली आहे. तर आजपर्यंत एकूण ९४ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ३२ व्यक्तींना ठेवण्यात आले असून २५५ व्यक्तींना होम क्वॉरण्टाइन राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
येवला शहरापाठोपाठ तालुक्यातील अंगणगाव, गवंडगाव, पाटोदा या गावातही प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने ही तीनही गावे कंटेंनमेंट झोन म्हणून जाहीर केली आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात कंटेंनमेंट झोनची संख्या आता पाच झाली आहे.
येवला शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ होती, त्यात शहरातील १३ वर्षीय तरूण व १७ वर्षीय तरुणीची भर पडली. असे असले तरी यातील २ कोरोनाबाधित (एक वैद्यकीय अधिकारी व स्टाफ) निफाड तालुक्यातील असल्याने येवला तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या २५ झाली आहे. येवला उपजिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या स्वॅबबरोबर निफाड तालुक्यातील या दोघांचेही स्वॅब येवल्यातून पाठविले गेले होते, त्यामुळे येवल्यातील रुग्णसंख्येत या दोघांची भर दिसून येत होती. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एक आरोग्य विभागातील कर्मचारी, एक आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी व एक पोलीस यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाबाधित आरोग्य विभागातील कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयाशी संबंधित असल्याने तीन दिवस रुग्णालय बंद ठेवून रुग्णालय व परिसराचे सॅनिटायझेशन केले गेले.
शुक्रवारी आलेल्या २१ अहवालात येवल्यातील १९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आजपर्यंत शहरासह तालुक्यातील निगेटिव्ह अहवालांची एकूण संख्या ९४ झाली आहे. ६७ संशयितांचे स्वॅब घेतले जात आहेत.
संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ८४ व्यक्तींना ठेवण्यात आले होते त्यापैकी ५२ व्यक्तींना विलगीकरण केंद्रातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याने आता ३२ व्यक्ती विलगीकरण केंद्रात आहेत. याबरोबरच २५५ व्यक्तींना होम क्वॉरण्टाइन राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.
---------
परप्रांतीयांची गर्दी
येवला उपजिल्हा रुग्णालयात परप्रांतीय मजुरांनी स्थलांतरणासाठी आवश्यक असणारे विविध प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गर्दी केली होती, मात्र येवला रेडझोनमध्ये येत असल्याने स्थलांतरणाकरिता देण्यात येणारे वैद्यकीय प्रमाणपत्र थांबविण्यात आल्याचा खुलासा करून याबाबत विचारणा करू नये, अशी नोटीस रुग्णालय प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आली आहे.