‘केबीसी’ आरोपींना वाचविण्याचे षडयंत्र

By admin | Published: November 21, 2015 11:55 PM2015-11-21T23:55:39+5:302015-11-21T23:56:04+5:30

एजंटांची टोळी कार्यरत : गुंतवणूकदारांकडून खोटी शपथपत्रे भरून घेत असल्याची तक्रार

Conspiracy to save 'KBC' accused | ‘केबीसी’ आरोपींना वाचविण्याचे षडयंत्र

‘केबीसी’ आरोपींना वाचविण्याचे षडयंत्र

Next

नाशिक : केबीसी घोटाळ्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा आरोपी भाऊसाहेब चव्हाण याला वाचविण्यासाठी एजंट कार्यरत झाले असून, ठेवीदारांना चुकीचे शपथपत्र तयार करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे या प्रकारच्या एजंटांना पायबंद घालण्यासाठी विविध योजना राबविणाऱ्या एजंटांवर कारवाई करावी, अशी मागणी केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष समितीने केली आहे.
केबीसी घोटाळ्याची व्याप्ती नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्यात असून राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे असतानादेखील आजवर या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण यांना पोलीस अटक करू शकलेले नाहीत. परिणामी घामाने जमवलेली रक्कम परत न मिळाल्याने अनेक गुंतवणूकदारांच्या मुलांचे विवाह, शिक्षण खोळंबले आहेत. सर्वसामान्य नागरिकांची अशा प्रकारची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक तर झालेली नाही; परंतु त्यांना सोडविण्यासाठी राज्यभर एजंटांची टोळी कार्यरत झाली आहेत. गुंतवलेली सर्व रक्कम परत करतो; परंतु कोणतीही तक्रार नाही असे शपथपत्र द्या अशा आशयाच्या अटी घालून नागरिकांकडून शपथपत्र भरून घेतले जात आहेत. अशा प्रकारचे शपथपत्र देणाऱ्यांना तीन महिन्यांत गुंतवणुकीची रक्कम परत देण्याचे आमिषही दाखवले जात आहे.
आधीच जमा पुंजी गेलेल्या गुंतवणूकदारांना किमान गुंतवणूक केलेली रक्कम परत हाती पडण्याच्या शक्यतेने नोटरीकडे शपथपत्र तयार करण्यासाठी गर्दी केली आहे. वास्तविक गुन्हा दाखल झाल्यानंतर भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी हे सिंगापूरला फरार झाले असून, तेथून परतणे अवघड झाल्याने तीन महिन्यांत भाऊसाहेब चव्हाण भारतात परत येणार असून, तो सर्व रक्कम परत देणार असल्याच्या अफवा या एजंटांकडून पसरविल्या जात आहेत. तसेच खोटे शपथपत्र तयार करून घेऊन गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे संबंधित एजंटांवर कारवाई करावी, अशी मागणी समितीच्या वतीने गणेश कदम, विजय वाहुळे, शिवा तेलंग, उमेश शिंदे, संतोष माळोदे, ज्ञानेश्वर थोरात, ज्ञानेश्वर दाते, नितीन पाटील, सागर माळोदे, अनिल पवार, कुंदन चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Conspiracy to save 'KBC' accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.