रचला कट : रोकड लुटल्याचा नाशिकच्या व्यापाऱ्याचा बनाव पोलिसांकडून उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 06:32 PM2018-04-25T18:32:19+5:302018-04-25T18:32:19+5:30
सीसीटीव्ही कॅमे-यांचे त्यावेळचे चित्रीकरण तपासत संशयित हालचालींवरून चित्रीकरणात दिसणा-या संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
नाशिक : लासलगावच्या एका बॅँकेतून काढलेली नऊ लाख रुपयांची रोकड मोटारीतून विंचूर रस्त्यावरून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन इसमांनी लुटल्याची घटना गेल्या सोमवारी (दि. २३) घडली होती; मात्र या घटनेचा तपास करताना नाशिकच्या ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सत्य उजेडात आणले असून, लुटीची घटना घडली नसून व्यापा-याने लुटीचा केलेला तो बनाव होता, अशी कबुली त्याने तपासात दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निफाड तालुक्यातील पाचोरे बुद्रुक येथील रहिवासी असलेले शेतमालाचे व्यापारी राहुल शंकर सानप यांनी अॅक्सिस बॅँकेतून नऊ लाख रुपयांची रोकड धनादेशाद्वारे काढली. रोकडची बॅग मोटारीच्या पुढील चालकाशेजारी असलेल्या बाकावर ठेवली. दरम्यान, विंचूररोडने मार्गस्थ होताना वाहन नादुरुस्त झाले. त्यावेळी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले असता दोघा अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येत डोळ्यात मिरची पूड फेकून मोटारीतील रोकड असलेली बॅग पळविली, अशी फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर लासलगाव, निफाड तालुक्यात व्यापा-याची लूट झाल्याची घटना वेगाने पसरली व व्यापा-यांनी या घटनेचे निषेध करत लासलगाव बाजार समिती, विंचूर बाजार समितीमध्ये मंगळवारी (दि. २४) व्यवहार बंद ठेवले होते. घटनेचे गांभीर्य व स्वरूप लक्षात घेता लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याची गंभीर दखल पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी घेत तत्काळ जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार निफाड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक गि-हे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमे-यांचे त्यावेळचे चित्रीकरण तपासत संशयित हालचालींवरून चित्रीकरणात दिसणा-या संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फिर्यादी सानप यांची जबाबामधील माहिती व चित्रीकरणातील हालचाली यांच्यात विसंगती असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांचा संशय बळावला.
---
गुन्ह्याची कबुली
सानप यांना खाक्या दाखवत तपासकौशल्याचा वापर करत चौकशी केली. त्यांनी कर्जबाजारीपणामुळे रोकड लुटीचा बनाव केला व मावसभाऊ आणि एका साथीदाराच्या मदतीने कट रचल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्यासह गुन्ह्यात सहभागी त्यांचा मावसभाऊ अभिजित भाऊसाहेब सानप (रा. निमगाव), रमेश नामदेव सानप (पाचोरे) यांना अटक केली आहे. कटामध्ये ठरल्याप्रमाणे अभिजित याने मिरचीची पूड डोळ्यात फेकून रोकडची बॅग घेऊन पोबारा केला. तसेच रमेश याने सानप यांना दवाखान्यात दाखल केले.