अवजड वाहन थांब्यामुळे वाहतुकीस सतत अडथळा
By admin | Published: January 18, 2017 11:43 PM2017-01-18T23:43:45+5:302017-01-18T23:44:06+5:30
वडाळा-पाथर्डीरोड : वाहतूक शाखेचे दुर्लक्ष
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगरलगतच्या रस्त्यावर तासन्तास उभ्या राहणाऱ्या कंटेनरमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच लहान-मोठे अपघातही घडत आहेत. शहर वाहतूक पोलीस विभागाने या रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या कंटेनरधारकांवर तातडीने कारवाई करावी. तसेच सीमेंट गुदामधारकांकडे वाहनतळाची सोय नसल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी, अन्यथा त्रस्त रहिवासी आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे. कलानगर ते पाथर्डीगाव वडाळा-पाथर्डी रस्त्याचे सुमारे वर्षभरापूर्वी रुंदीकरण व डांबरीकरण तसेच सुशोभिकरण करण्यात आले. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. या रस्त्यालगतच इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगर, समर्थनगर, पांडवनगरी, शरयूनगरीसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे आणि अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठीही जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. तसेच रस्त्यालगतच तीन प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांसह महाविद्यालय आहे. त्यामुळे शेकडोच्या संख्येने विद्यार्थी वर्ग ये-जा करीत असतो. परंतु वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून अवजड वाहनास परवानगी नसतानाही सर्रासपणे दिवसभर सीमेंटच्या गोण्या घेऊन सुमारे ४० ते ५० चाकांचे कंटेनर बेफान वेगाने ये-जा करीत असतात. सराफनगरलगतच सीमेंटच्या गोण्या टाकून वाहतूक करण्यात येते. त्यामुळे तासन्तास उभा राहणाऱ्या कंटेनरमुळे वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनले आहे. लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.