पुरोगामी लोकशाही आघाडी गठित
By admin | Published: January 22, 2017 12:46 AM2017-01-22T00:46:14+5:302017-01-22T00:46:27+5:30
१२२ जागा लढविणार : कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अद्याप भिजत घोंगडे
नाशिक : भाजपा-शिवसेनाचा पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचे भिजत घोंगडे कायम असताना दहा संघटनांनी एकत्र येत पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन केली आहे. सर्व १२२ जागा लढविण्याची घोषणाही या आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांनी व्यावसायिक राजकारणाचा घोळ क रत समाजाची लूट केली. या लुटीपासून नाशिकचा बचाव करण्यासाठी गुन्हेगारी व भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी स्वच्छ प्रशासन नाशिककरांना देण्याकरिता पुरोगामी लोकशाही आघाडी निवडणुकीमध्ये सर्व जागा लढविणार असल्याची घोषणा मुख्य समन्वयक डॉ. संजय अपरांती यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी (दि.२) केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पुरोगामी विचारांच्या संघटना एकत्र आल्या आहेत. लोकशाही आघाडीचा कोणताही उमेदवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा राहणार नाही. स्वच्छ चारित्र्य व सुशिक्षित उमेदवार जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर एआयएमआएएमचे जिल्हा निरीक्षक पंडितराव बोर्डे, बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र जगताप, रिपाइं सेक्युलरचे विजय बागुल, आवामी विकास पार्टीचे शहराध्यक्ष सरफराज पठाण, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजिज पठाण, संभाजी ब्रिगेडचे योगेश निसाळ, एपीआयचे राज्य सरचिटणीस कैलास पगारे, बहुजन भीम सेनेचे संजय खरात आदि उपस्थित होते. वरील सर्व संघटनांचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय नेतेदेखील प्रचार सभांना उपस्थित राहून जनतेपुढे भूमिका मांडणार असल्याचे अपरांती यांनी यावेळी स्पष्ट केले. आघाडीमध्ये एकू ण दहा संघटनांचा समावेश आहे.सर्व प्रस्थापित पक्ष व त्यांच्या लोकप्रतिनिधींनी नाशिककरांना अद्याप धोकाच दिला आहे. नाशिकचा तसा बघितला तर सर्वांगीन विकास साधण्यामध्ये या लोकप्रतिनिधींना कुठलेही यश आल्याचे दिसून येत नाही. नाशिक महापालिकेत भ्रष्टाचार होत असून, ठेकेदार पोसण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.