संविधान हा लोकशाहीचा धर्मग्रंथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:14 AM2021-05-07T04:14:41+5:302021-05-07T04:14:41+5:30
नाशिक : भारतात संविधान हाच लोकशाहीचा धर्मग्रंथ असून, इथे कुणा एकाची सत्ता, पॉवर चालूच शकत नाही. म्हणूनच कितीही चढउतार ...
नाशिक : भारतात संविधान हाच लोकशाहीचा धर्मग्रंथ असून, इथे कुणा एकाची सत्ता, पॉवर चालूच शकत नाही. म्हणूनच कितीही चढउतार आले तरी देशात लोकशाही सार्वभौम आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जायभावे यांनी केले. डिजिटल वसंत व्याख्यानमालेत सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
स्व. द. तु. जायभावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित 'भारतीय घटना आणि नागरिक 'या विषयावर जायभावे यांनी संवाद साधला. देशाची निर्मिती, घटना, मसुदा समिती, घटनेतील अनुच्छेद, अनुसूचि या विषयांचा समूळ आढावा घेत जायभावे यांनी या देशातील,नागरिक,सत्ताधारी,न्यायव्यवस्था, संसद यावर आधारित भाष्य केले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील नागरिकांना समाजव्यवस्थेला समृद्ध आयुष्य देण्याचे काम घटनेच्या माध्यमातून केले. म्हणून, आजपर्यंत १२५ घटना दुरुस्त्या होऊनही देश प्रगतीच्या दिशेने झेपावतोय, समाजाचे हित या दुरुस्त्यांनी केल्याचे मत जायभावे यांनी व्यक्त केले. संविधानाचे स्वरूप काय ? त्याची मांडणी समाजासमोर गेली पाहिजे, सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी आपले हक्क काय आहेत हे नागरिकांना ज्ञात असावेत, असा मानस ॲड. जायभावे यांनी व्यक्त केला. या देशातील उत्पादनांची साधने जनतेची असून ती एका माणसाच्या हाती नाहीत,तर ती लोककल्याणासाठी वापरली जावीत असेही घटना अधोरेखित करते. म्हणूनच, आणीबाणीचा उल्लेख करून जायभावेंनी अशाही परिस्थितीत जनतेचे मूलभूत अधिकार स्थगित करता येणार नाहीत, अशी दुरुस्ती घटनेत केली गेली, हे भारतीय घटनेचे प्रगतिशील रूप असल्याचे जायभावे म्हणाले.
७० वर्षांत सामाजिक विषमता वाढत असून, घटनेने सांगितलेल्या बंधुत्वाकडे आपले दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट करून समाजाला मूलभूत कर्तव्याची जाणीव करून देण्याची गरज ॲड. जायभावे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले.
-----
आजचे व्याख्यान : सुरेश भटेवरा
विषय : पाच राज्यांतील निवडणूक निकालांचा अन्वयार्थ
------------------
फोटो
०६ॲड. जायभावे