राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसचा संविधान मोर्चा
By श्याम बागुल | Published: November 26, 2018 04:21 PM2018-11-26T16:21:43+5:302018-11-26T16:21:51+5:30
शासनाचा जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमार येथे निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
नाशिक : सध्याच्या केंद्र व राज्य सरकारने अनेक देशविरोधी निर्णय घेऊन भारतीय राज्यघटनेचा दुरुपयोग चालविला असल्यामुळे भारताची लोकशाही ही धोक्यात आली असल्याचा आरोप करून शासनाचा जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमार येथे निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वत:चा फायदा करून घेत असताना समाजातील इतर कुठल्याही घटकाला त्रास होता कामा नये, अशी आपल्याला संविधानाची शिकवण आहे. मात्र आज देशभरात ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत, त्यात सत्ताधारी स्वत:च्या फायद्याच्या गोष्टींवर लक्ष देत आहेत. त्यामध्ये संविधानांच्या अनेक मूल्यांना धक्का बसल्याचे आढळत आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले म्हणून आपण सर्व देशात शांतीने वावरत आहोत. त्याचमुळे आपल्याला संविधानाने मूलभूत अधिकार दिले. मात्र शासन त्या अधिकारावर गदा आणत असून, संविधानातील नमूद केलेल्या समानता, एकता, बंधुभाव, स्वातंत्र्य या मूल्यांचे पालन होताना दिसून येत नाही. महिला व बालकांवर होणारे अत्याचार, सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणे तसेच दलित व मागासवर्गीय समाजावर होणाºया अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, समाजात अशांतता पसरली आहे. प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे, दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्षा डॉ. भारती पवार, विजयश्री चुंभळे, समिना मेमन, कविता कर्डक पुष्पलता उदावंत, मेघा दराडे, संगीता राऊत, पूनम गवळी, सरला गायकवाड, आफरीन सय्यद, नंदा काळे, वनिता सिंग, संध्या भगत, कांचना रेवगडे आदी उपस्थित होत्या.