देशवंडीतील पुलाचे बांधकाम पाडले
By admin | Published: May 30, 2017 12:19 AM2017-05-30T00:19:39+5:302017-05-30T00:19:50+5:30
नायगाव : ब्राह्मणवाडे - पाटपिंप्री या रस्त्यावरील देशवंडी येथील सुरू असलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नायगाव : ब्राह्मणवाडे - पाटपिंप्री या रस्त्यावरील देशवंडी येथील सुरू असलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या. याबाबत ‘लोकमत’ने १८ मे रोजी वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित विभागाने सदर बांधकाम पाडले आहे. यामुळे देशवंडीकरांनी लोकमतचे कौतुक केले आहे.
ब्राह्मणवाडे-पाटपिंप्री या १६ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. सदर रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने चालू असताना त्याच्या दर्जाबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे. असे असतानाच गेल्या महिन्यात देशवंडी गावानजीक पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तथापि, सदर पुलाच्या कामासाठीचे वाळू, सिमेंट, स्टील, खडी आदी सर्वच साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरले जात असल्याने ग्रामस्थांनी सदर कामाबाबत नाराजी व्यक्त करत पुलाचे काम थांबवले होते. देशवंडी येथील पुलाच्या निकृष्ट कामाबाबत ‘लोकमत’ने ‘पुलाचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर निकृष्ट बांधकाम जेसीबी मशीनच्या साहाय्याने पाडले आहे. यामुळे नागरिकांनी निकृष्ट दर्जाचे काम थांबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.