उद्योगांसाठी बांधकामाची अट होणार शिथील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:18 AM2021-08-26T04:18:27+5:302021-08-26T04:18:27+5:30
नाशिक : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाशी संबंधित विविध अडचणींसंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ...
नाशिक : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाशी संबंधित विविध अडचणींसंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार भूखंडावरील ४० टक्के बांधकाम करण्याची अट शिथिल करून २० टक्के करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याचे महाराष्ट्र चेंबरने पत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. उद्योगांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध बाबींकरिता पूर्तता कराव्या लागतात. त्यात चटई निर्देशांक, इमारत पूर्णत्वाचा दाखला, ट्रान्सफर मुदतवाढ व अनुदानाबाबत असलेल्या अडचणींची माहिती दिली तसेच महाराष्ट्र चेंबरतर्फे नाशिकला महिला क्लस्टरसाठी भूखंड मिळविण्याकरीता बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न करत असल्याचेही नमूद करण्यात आले. उद्योग मंत्रालयाने महिला उद्योग धोरणानुसार नाशिकच्या महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरीता महिला क्लस्टरसाठी भूखंड द्यावा, अशी मागणी केली. शिष्टमंडळात आमदार चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, संजय शेटे, अतुल पाटील, श्रीकांत पोतनीस, गोरख माळी, नितीन दलवाई, सागर नागरे उपस्थित होते.