आर्टिलरीच्या हद्दीजवळ बांधकामास निर्बंध
By Admin | Published: October 15, 2016 02:50 AM2016-10-15T02:50:14+5:302016-10-15T02:52:02+5:30
लक्षवेधी : परवानग्या देण्याची मागणी
नाशिक : महापालिका हद्दीतील आर्टिलरी सेंटर व विमानतळ सभोवताली १०० मीटर अंतरापर्यंत बांधकाम परवानग्या न देण्याबाबत संरक्षण मंत्रालयाने निर्बंध लादल्याबद्दलची लक्षवेधी शिवसेनेचे नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी महासभेत दिली, परंतु त्यावर चर्चाच होऊ न शकल्याने प्रश्न प्रलंबितच राहिला आहे. दरम्यान, सहाणे यांनी सदर निर्बंध हटविण्याची आणि बांधकामांना परवानग्या देण्याची मागणी केली आहे.
सध्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रारूप विकास आराखड्यातही आर्टिलरी सेंटर व विमानतळ लगत असलेल्या जमिनी रहिवासी विभागात दर्शविण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत परिसरात ७० टक्के क्षेत्रात रहिवासी इमारती उभ्या आहेत. परंतु मे २०१६ मध्ये संरक्षण मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार आणि देवळाली कॅम्पचे स्टेशन कमांडंट यांनी महापालिकेला पाठविलेल्या पत्रानुसार मे २०१६ पासून सदर विभागात बांधकाम परवानगी देताना स्टेशन कमांडंट यांचे कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आर्टिलरी सेंटर हद्दीपासून १०० मीटर अंतरापर्यंत होणाऱ्या बांधकामास प्रतिबंध केला जात असून, त्यांचे काही अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येऊन नागरिकांना धमकावत असल्याचे सहाणे यांनी म्हटले आहे.
सदर प्रश्न हा परिसरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असून, महापालिकेने स्टेशन कमांडंट यांच्या कार्यालयाचे कुठलेही ना हरकत प्रमाणपत्र न मानता बांधकाम परवानग्या द्याव्यात व तसा ठराव करून तो संरक्षण मंत्रालयाला कळवावा, असेही सहाणे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)