बांधकाम शुल्क निम्म्याने कमी होणार
By admin | Published: February 10, 2016 10:54 PM2016-02-10T22:54:29+5:302016-02-10T22:57:29+5:30
बैठक : आमदार-खासदार निधीतल्या कामांना ना हरकत प्रमाणपत्र स्थायीत मिळणार
सिन्नर : बांधकामांना परवानगी देताना यापूर्वी आकारले जाणारे बांधकाम विकास मूल्य आता बांधकामाच्या मूल्याऐवजी विकसित जमिनीच्या किमतीवर आकारण्याचा निर्णय
सिन्नर नगरपालिकेच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे सिन्नरकरांचे बांधकाम विकास मूल्य जवळपास निम्म्याने कमी होणार
आहे.
६ फेब्रुवारी (शनिवार) रोजी नगरपालिकेची मासिक बैठक सत्ताधारी गटाचे जवळपास निम्मे व विरोधी गटाचे नगरसेवक गैरहजर राहिल्याने गणपूर्तीअभावी तहकूब झाली होती. सदर बैठक पुन्हा आज (बुधवारी) पालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती. नगराध्यक्ष आश्विनी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बांधकाम विकास शुल्काच्या निर्णयासह विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. आमदार, खासदार निधीतून पालिका हद्दीत करण्यात येणाऱ्या विकासकामांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्याचा निर्णयही मासिक सभेत मंजूर करण्यात आला.
पालिका कार्यालयातील आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, पालिका हद्दीतील खुली जागा सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संस्थेस देणे, स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, पथदीप बसविणे, बंदिस्त पाई गटारीसह रस्ता काम करणे, पालिकेची तीन तोंडी विहिरीची दुरुस्ती करणे, हुतात्मा चौक ते म्हसोबा मंदिर ते नायगाव रस्त्यापर्यंत विद्युतवाहिन्या भूमिगत करणे आदिंसह विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.
बैठकीत माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नामदेव लोंढे, बापू गोजरे, हर्षद देशमुख, मल्लू पाबळे, विरोधी गटनेते विजय जाधव, प्रमोद चोथवे, शैलेश नाईक, मनोज भगत, डॉ. प्रतिभा गारे, राजश्री कपोते, शीतल कानडी, उज्ज्वला खालकर, लता मुंडे, पुष्पा लोणारे, लता हिले, शुभांगी झगडे, मनीषा घोरपडे, सुजाता गाडे, मंगला जाधव, विजया बर्डे, मुख्याधिकारी संजय जाधव उपस्थित होते, तर उपनगराध्यक्ष संजय नवसे, मेहमूद दारुवाले, हरिश्चंद्र लोंढे अनुपस्थित होते. (वार्ताहर)