बांधकाम अभियंत्याची तिरुपती ‘विमानवारी’ चर्चेत
By admin | Published: February 11, 2015 12:39 AM2015-02-11T00:39:01+5:302015-02-11T00:41:15+5:30
बांधकाम अभियंत्याची तिरुपती ‘विमानवारी’ चर्चेत
नाशिक : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची तिरुपती विमानवारी चर्चेत असतानाच असाच प्रकार नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याच्या बाबतीत घडला असून, जिल्हा परिषदेतही या तिरुपती विमानवारीची खमंग चर्चा सुरू झाली आहे. मागील महिन्यात २३ ते २५ जानेवारी दरम्यान बांधकाम विभागातील एक अभियंता जिल्हा परिषदेशी निगडित कामे घेणाऱ्या मक्तेदारांसमवेत तिरुपती बालाजीला गेल्याचे वृत्त असून, याबाबत या तिरुपती विमानवारीमागे जिल्हा परिषदेशी निगडित कामांचा संबंध जोडण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही तिरुपतीवारी दरवर्षी होत असल्याची चर्चा असून, यंदाच मात्र ती विमानाने करण्यात आल्याचे समजते. नाशिक तालुक्यातील दोन आणि दिंडोरी तालुक्यातील दोन अशा चार मक्तेदारांसह संबंधित अभियंता मिळून पाच जणांनी ही तिरुपती बालाजीची विमानवारी केल्याचे सांगण्यात येते. ओझर विमानतळावरील बांधकाम विभागाच्याच अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाशी जिल्हा परिषदेचे कनेक्शन असल्याची चर्चा असतानाच आणि त्याचा इन्कार संबंधित अधिकाऱ्यांनी केलेला असतानाच हे नवीन प्रकरण समोेर आल्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने याबाबत सावधरीत्या माहिती घेण्याचे काम सुरू केल्याचे समजते. याबाबत एका लोकप्रतिनिधीला या विमानवारीची माहिती मिळाल्यानंतर या लोकप्रतिनिधीने या सर्व प्रकरणाची माहिती घेण्यास सुरुवात केल्याचे कळते.