बांधकाम परवानग्या; मंजुरीप्रक्रिया रखडली
By admin | Published: February 14, 2017 12:54 AM2017-02-14T00:54:21+5:302017-02-14T00:54:32+5:30
प्रशासनही संभ्रमात : आयुक्तांनी मागविले मार्गदर्शन
नाशिक : शहर विकास आराखड्याला राज्य शासनाकडून भागश: मंजुरी मिळाल्यानंतरही त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही आणि नवीन विकास नियमावलीबाबत सुरू असलेला लपाछपीचा खेळ थांबलेला नाही. या कोंडीत बांधकाम परवानग्यांची मंजुरी प्रक्रिया रखडली असून, महापालिकेच्या नगररचना विभागाकडून केवळ प्रकरणे दाखल करून घेतली जात असताना निर्णय मात्र प्रलंबित ठेवले जात आहेत. कात्रीत सापडलेल्या बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारदांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.१३) आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन कोंडी फोडण्याची विनंती केली. यावेळी आयुक्तांनी शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
राज्य शासनाने शहर विकास आराखडा भागश: ९ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केला परंतु त्यासोबत शहर विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध न करण्याची खेळी खेळली. आराखड्याची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर महिनाभराने त्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ होतो. परंतु, महिना उलटूनही महापालिकेने नवीन आराखड्यानुसार अंमलबजावणी सुरू केलेली नाही. याउलट महापालिकेच्या नगररचना विभागाकडून दि. ९ फेबु्रवारीपासून बांधकाम परवानग्यांविषयीची नवीन प्रकरणे केवळ दाखल करून घेतली जात असून, नवीन विकास नियंत्रण नियमावलीपर्यंत त्यावर कोणतीही निर्णयप्रक्रिया न राबविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून बांधकाम परवानग्यांची मंजुरीप्रक्रिया पूर्णत: ठप्प झाली आहे. त्यामुळे अगोदरच विविध अडचणींनी पिचलेल्या बांधकाम व्यावसायिकांसह वास्तुविशारद-अभियंत्यांची मोठी कोंडी झाली आहे. महापालिकेने जोपर्यंत विकास आराखड्याची व नवीन विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत जुनाच आराखडा व विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम परवानग्यांसंबंधीची प्रकरणे मंजूर करावीत, या मागणीसाठी क्रेडाई व वास्तुविशारद-अभियंत्यांच्या संघटना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. परंतु, आयुक्तांनीही त्यावर अधिक भाष्य न करता राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, सेक्रेटरी उमेश वानखेडे, अनिल अहेर, मनोज खिंवसरा, प्रदीप काळे, ऋषिकेश पवार, हेमंत दुगड, अरुण काबरे, राजू ठक्कर, सचिन गुळवे, सचिन बागड, नितीन कुटे, रवि महाजन, सुनील गवादे यांसह वास्तुविशारद व अभियंता संघटनांचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)