पापक्षालनासाठी मंदिरांची उभारणी : नृसिंह सरस्वती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:39 AM2018-03-22T00:39:11+5:302018-03-22T00:39:11+5:30
हिंदू धर्मशास्त्रात मनुष्य जीवनातील पापक्षालनासाठी मंदिरे उभारण्याची परंपरा निर्माण केली आहे. आपण आपल्या गावात ज्या ठिकाणी राहतो त्याचठिकाणी देवाचे नामस्मरण करून मनुष्य आपल्या पापाचे परिमार्जन करू शकतो.
देवळाली कॅम्प : हिंदू धर्मशास्त्रात मनुष्य जीवनातील पापक्षालनासाठी मंदिरे उभारण्याची परंपरा निर्माण केली आहे. आपण आपल्या गावात ज्या ठिकाणी राहतो त्याचठिकाणी देवाचे नामस्मरण करून मनुष्य आपल्या पापाचे परिमार्जन करू शकतो. मात्र त्याआधी गावा तील जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करणेदेखील सांगितले असल्याचे प्रतिपादन करवीर पीठाधीश्वर जगद्गुरू श्रीमद् पूज्य श्री शंकराचार्य स्वामी नृसिंह सरस्वतीजी यांनी केले. लोहशिंगवे या गावी जगद्गुरू द्वाराचार्य रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या प्रेरणेने नीळकंठेश्वर महादेव पिंड व नंदीच्या मूर्ती स्थापना व नवीन मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. व्यासपीठावर जगद्गुरू द्वाराचार्य रामकृष्णदास महाराज लहवितकर, स्वामी भैरवानंदगिरीजी महाराज, स्वामी गणेशगिरीजी महाराज, नामदेव महाराज सगर, खासदार हेमंत गोडसे, वेदमूर्ती मकरंदशास्त्री गर्गे, ज्ञानेश्वर महाराज तुपे, पंढरीनाथ महाराज सहाणे, मोहन करंजकर, मनपा बालकल्याण सभापती सरोज अहिरे, पंचायत समिती सदस्य डॉ. मंगेश सोनावणे, अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरपंच संतोष जुंद्रे, उपसरपंच मनीषा जैन आदींनी स्वागत केले. यावेळी खासदार गोडसे व साधू-संतांची आशीर्वादपर भाषणे झाली. दरम्यान दुपारी ११ जोडप्यांच्या हस्ते रुद्रस्वाहाकार संपन्न झाल्यानंतर येथील पुरातन गोरक्षनाथ मंदिराचे शिलापूजन व मूर्तीचे धान्याधिवास, पिंडीची व नंदीच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, क्षेत्रपाल पूजन, उत्तरांग हवन सुवर्ण कलशारोहण, पूर्णाहुती, आरती संत महात्म्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.