साडेतीन लाख शौचालयांचे बांधकाम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:31 AM2020-12-16T04:31:05+5:302020-12-16T04:31:05+5:30
नाशिक जिल्ह्यात सन २०१२ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार शौचालय नसलेले ३ लाख २५ हजार ८१८ कुटुंब होते. यापैकी सन ...
नाशिक जिल्ह्यात सन २०१२ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार शौचालय नसलेले ३ लाख २५ हजार ८१८ कुटुंब होते. यापैकी सन २०१२ ते २०१८ या कालावधीत ३ लाख २१ हजार ८४२ शौचालयांचे बांधकाम करण्यात आले तर शौचालयाची जागा नसलेल्या ३९७६ कुटुंबांना सार्वजनिक शौचालयांशी जोडण्यात आले. सन २०१२ मधील पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबासाठी सन २०१८-१९ मध्ये पुन्हा गावपातळीवर सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून ३५ हजार ७५३ नवीन कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे आढळून आले. जुलै २०२० अखेरपर्यंत सर्व ३५ हजार ७५३ कुटुंबांनी शौचालय बांधकाम केले असून, त्यांना प्रोत्साहन अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यानंतरही शौचालय नसलेल्या कुटुंबांसाठी २०२०-२१ मध्ये पुन्हा मोहीम राबविण्यात आली यामधून १५,२०९ कुटुंबांकडे शौचालय नसल्याची माहिती प्राप्त झाली. ऑक्टोबर २०२० अखेरपर्यंत या सर्व शौचालयांचेदेखील बांधकाम करून त्यांना प्रोत्साहन अनुदान वितरण करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान टप्पा २ मध्येदेखील अद्यापही जिल्ह्यात शौचालय उपलब्ध नसलेल्या कुटुंबांची माहिती मागविण्यात आली असून त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करण्यात येणार आहे.
-----
सरकारच्या योजनेमुळे गाव हगणदारीमुक्त होण्यास मदत झाली. त्यातून नागरिकांमध्ये आरोग्याची जागृती झाली. रोगराई कमी होण्यास हातभार लागला असला तरी, हगणदारीमुक्तीसाठी गावात कायमस्वरूपी पाण्याची सोय गरजेची आहे.
- त्र्यंबक गुंबार्डे, सरपंच
--------
प्रत्येक घराघरात शौचालयांचे बांधकाम करून देण्यात आले; मात्र अजूनही काही नागरिकांना त्याचे अनुदान मिळाले नाही. शौचालय वापरण्यासाठी गावात पाण्याची सोय हवी.
- समाधान जाधव, गावकरी
-----
अडगळीच्या सामानासाठी होतो वापर
शौचालय वापरण्यासाठी गावात पाण्याची बारमाही सोय नाही. त्याच बरोबर उघड्यावर बसण्याची सवय लागल्यामुळे शौचालयाचा वापर करण्याची मानसिकता नसल्याने अनेकांनी घराबाहेरील शौचालयाचा वापर अडगळीचे सामान ठेवण्यासाठी सुरू केला आहे.