नदीपात्रात भिंतीची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:14 AM2018-03-03T00:14:12+5:302018-03-03T00:14:12+5:30
येथील पुरातन ऐश्वर्य मंदिराला वाहत्या पाण्याने धोका निर्माण होऊ नये यासाठी सरस्वती नदीपात्रात मंदिराच्या बाजूने संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर मंदिरास संरक्षक भिंतही बांधण्यात येत आहे.
सिन्नर : येथील पुरातन ऐश्वर्य मंदिराला वाहत्या पाण्याने धोका निर्माण होऊ नये यासाठी सरस्वती नदीपात्रात मंदिराच्या बाजूने संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर मंदिरास संरक्षक भिंतही बांधण्यात येत आहे. राष्ट्रीय पुरातत्व विभागाकडून मंदिर संरक्षणासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे ८ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. सरस्वती नदीपात्राच्या शेजारी हे ऐतिहासिक मंदिर असून, उंचावर असणाºया या मंदिराच्या संरक्षक भिंतीची नदीला पूर आल्यानंतर पडझड होत असते. त्यातून मंदिराला धोका होऊ नये यासाठी पुरातत्व विभाग काळजी करू लागल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे. पुरातत्व विभागाचे कार्यालय औरंगाबाद येथे असून, तेथीलच ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. या ठेकेदाराने आपल्याच भागातील मजूर या कामासाठी आणले असून, या कामगारांनी आपले पाल मंदिराच्याच आवारात टाकले आहे. दिवस-रात्र हे मजूर तेथेच राहात असल्याने मार्चपूर्वी हे काम पूर्ण होण्यात कुठलीही अडचण येण्याची शक्यता नाही. या कामासाठी डबर, वाळू, सीमेंट स्थानिक पातळीवरच खरेदी करण्यात आले असून, बाजारात वाळूची टंचाई जाणवत असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. पुरातत्व विभाग हे ऐश्वर्य मंदिर आपले आहे, या भावनेतून मंदिरासह त्याच्या परिसराला धोका होऊ नये यासाठी काळजी घेऊ लागल्याने भाविकांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे.
साडेआठ फूट उंचीची दगडी भिंत
सरस्वती नदीपात्रात मंदिराच्या बाजूने जवळपास दीड मीटर रुंदीची आणि साडेआठ फूट उंचीची दगडी भिंत उभारण्यात येत आहे. नदीपात्रात जवळपास दीड मीटर खोल नळी खोदून त्यावर या संरक्षक भिंतीचे काम करण्यात येत आहे. सुमारे ५० मीटर लांब अशी ही दगडी भिंत असणार आहे. मंदिराच्या बाजूने ती नदीपात्रापासून आठ फुटापर्यंत सरळ उंच जाणार असली तरी नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहाचा मारा तिला सहन व्हावा यासाठी ही भिंत वरच्या बाजूने निमुळती होत जाणार आहे.