नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तात बांधकाम कामगारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 07:05 PM2018-12-12T19:05:54+5:302018-12-12T19:06:12+5:30
नाशिक : बांधकाम कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी केल्याने मोठी झुंबड उडाली. हजारो कामगार एकत्र आल्याने प्रशासनाला अखेर ...
नाशिक : बांधकाम कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी केल्याने मोठी झुंबड उडाली. हजारो कामगार एकत्र आल्याने प्रशासनाला अखेर पोलीस बंदोबस्तात नाव नोंदणी करावी लागली.
राज्य सरकारने राज्यातील बांधकाम मजुरांसाठी बांधकाम कामगार मंडळाची स्थापना केली असून, या मंडळाच्या माध्यमातून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. त्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयात रितसर नोंदणी करणे गरजेचे आहे. बहुतांश मजुरांनी नोंदणी केली नसल्याने त्यांना लाभ मिळत नाही. आठवड्यातून एक दिवस नोंदणी केली जात असल्याने बुधवारी सकाळपासून बांधकाम मजुरांनी मोठी गर्दी केली होती. हजारोंच्या संख्येने कामगार एकाच ठिकाणी जमा झाल्याने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. कामगारांनी एकच गोंधळ केल्याने अखेर पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. पोलिसांनी शांतता प्रस्थापित केल्यानंतर कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास झांबरे, ललित दाभाडे, विशाल जोशी,आर.जी. लाडे, पी.पी. जाधव, वैभव अहिरे, सोमनाथ बनसोडे आदींनी कामगारांची नोंदणी केली. रात्री उशिरापर्यंत नोंदणीचे काम सुरू होते. जिल्ह्यात यापूर्वी सुमारे २५ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे. बुधवारी जवळपास दीड हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली. यात महिला कामगारांची संख्या मोठी होती. नोंदणीसाठी आलेल्या कामगारांनी घरूनच जेवणाचा डबा सोबत आणला होता.