ग्राहक मंचाने चार बॅँकांना ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 06:51 PM2019-08-24T18:51:00+5:302019-08-24T18:54:04+5:30
पेटीत टाकलेल्या धनादेशावर कु ठल्याहीप्रकारची खाडाखोड होत नाही; मात्र या घटनेत खाडाखोड करून नावात बदल करून परस्पर धनादेश दुस-या बॅँकेच्या शाखेत नेऊन टाकला गेला आणि संबंधित बॅँकेने तो वटवून धनादेशावरील रक्कम अदा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : बॅँकांनी खातेदारांचे धनादेश वटविण्यापूर्वी संबंधित खातेधारकांशी संपर्क साधून खातरजमा करणे गरजेचे असून, ही बॅँकांची जबाबदारी असल्याचे सांगून ग्राहक मंचाने चार बॅँकांना दंड ठोठावला आहे. धनादेशावरील रक्कम दहा टक्के व्याजाने परत करावी आणि शारीरिक-मानसिक त्रासापोटी पाच हजार व खर्चापोटी तीन हजार असा दंड बॅँकांना ठोठावला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, तक्रारदार गणेशमल जगदीशप्रसाद राठी यांनी त्यांच्या खाते असलेल्या बॅँके चा ८० हजार ८५० रुपयांचा धनादेश मयुरेश प्रोटेंज नावाने नाशिकरोड येथील संबंधिताच्या बॅँकेच्या शाखेतून भरला. धनादेश डिपॉझिट पेटीत टाकल्यानंतर त्या धनादेशावरील रक्कम अदा करावयाच्या नावात खाडाखोड करून दुसरे नाव टाकले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सदर धनादेश तेथून काढून संबंधित दुसऱ्या नावाच्या व्यक्तीचे खाते शिवाजीनगरच्या एका शासकीय बॅँकेत असल्यामुळे नाशिकरोड येथील त्या बॅँकेच्या शाखेत धनादेश जमा करण्यात आला. शिवाजीनगर शाखेला धनादेश प्राप्त झाल्यानंतर त्याची कुठलीही खातरजमा न करता बॅँकेने खाडाखोडच्या बाबीकडे दुर्लक्ष करत बनावट व्यक्तीच्या नावावर धनादेश वटविला. ही बाब राठी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दिली. तसेच ग्राहक निवारण मंचाकडे अर्ज करून दाद मागितली. ग्राहक न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. राठी यांच्या वतीने अॅड. प्रवीण पारख यांनी बाजू मांडली. ग्राहक मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा कुलकर्णी, सचिन शिंपी यांनी तक्रारदाराची बाजू रास्त मानली.
प्रथमच घडला असा गंभीर प्रकार
बॅँकेच्या धनादेश ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये धनादेश खातेधारकाकडून टाकण्यात आल्यानंतर त्याची नोंद बॅँकेकडे होते. त्यामुळे बॅँकेने ते धनादेश वटविताना खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे ग्राहक मंचाने म्हटले आहे. पेटीत टाकलेल्या धनादेशावर कु ठल्याहीप्रकारची खाडाखोड होत नाही; मात्र या घटनेत खाडाखोड करून नावात बदल करून परस्पर धनादेश दुस-या बॅँकेच्या शाखेत नेऊन टाकला गेला आणि संबंधित बॅँकेने तो वटवून धनादेशावरील रक्कम अदा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.