ग्राहक जागृतीतून फसवणुकीवर नियंत्रण : मिलिंद सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:52 AM2018-12-25T00:52:20+5:302018-12-25T00:52:42+5:30
ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने ग्राहक कायद्यातील बदलांविषयी ग्राहकांमध्ये जागृतीचे काम होणे आवश्यक आहे. ग्राहक आपल्या हक्कांविषयी जागृत झाला तर फसवणुकीच्या प्रकरणांवर नियंत्रण मिळविणे शक्य असून, अशाप्रकारे ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे येणाऱ्या तक्रारींच्या संख्येतही आपोआपच घट होईल
नाशिक : ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने ग्राहक कायद्यातील बदलांविषयी ग्राहकांमध्ये जागृतीचे काम होणे आवश्यक आहे. ग्राहक आपल्या हक्कांविषयी जागृत झाला तर फसवणुकीच्या प्रकरणांवर नियंत्रण मिळविणे शक्य असून, अशाप्रकारे ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे येणाऱ्या तक्रारींच्या संख्येतही आपोआपच घट होईल, असे प्रतिपादन नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी केले.
मविप्रच्या इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर येथे सोमवारी (दि.२४) ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक शाखेतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मार्गदर्शन केंद्राचे व संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद बांधकाम सभापती मनीषा पवार, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विभागीय अध्यक्ष बाबा जोशी, मार्तंड जोशी, दत्ता शेळके, सुधीर काटकर, अरुण भार्गवे, सुरेशचंद्र धारणकर आदी उपस्थित होते. मिलिंद सोनवणे म्हणाले, सध्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाक डे मोठ्या प्रमाणात ग्राहक फसवणुकींची प्रकरणे प्रलंबित असून, नवीन प्रकरणांची यात भर पडत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी ग्राहकांची जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहक हितासाठी प्रयत्न करणाºया संघटनांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, ग्राहक जागृती रॅली, पथनाट्यांचे सादरीकरणही करण्यात आले.
यावेळी महानगरप्रमुख अॅड. सुरेंद्र सोनवणे सचिव सुरेश धारणकर, तालुका संघटक उल्हास शिरसाट, अॅड. राजेंद्र शेवाळे, प्रशांत देशमुख, वंदना जगताप, अॅड. शिवप्रसाद राणा, हेमंत साळी आदी उपस्थित होते.
अर्थव्यवस्थेच्या पंचप्राण पुरस्काराचे वितरण
शेतकरी, व्यापारी, कारखानदार, श्रमिक व ग्राहक यांचा त्यांनी त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी २०१८ चे ‘अर्थव्यवस्थेचे पंचप्राण’ या पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. यात मालेगावच्या टाकळी येथील माणिकराव शिवाजी अहिरे यांना आदर्श शेतकरी, नाशिकचे रोहित वैशंपायन यांना आदर्श व्यापारी, आशिष नहार यांना आदर्श कारखानदार, प्रशांत देशमुख यांना आदर्श श्रमिक व इगतपुरीचे अविनाश कासार यांना आदर्श ग्राहक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.