23 टक्क्यांनी वाढले पेन्शन योजनांचे ग्राहक; खाती पोहोचली ४.२४ कोटींवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 01:02 AM2021-04-26T01:02:43+5:302021-04-26T06:35:58+5:30
वर्षातील प्रगती : खाती पोहोचली ४.२४ कोटींवर
नाशिक : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणा (पीएफआरडीए) मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत असलेल्या खात्यांमध्ये सन २०२०-२१मध्ये २३ टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली असून आता या खात्यांची संख्या ४.२४ कोटींवर पोहोचली आहे. वृद्धापकाळाचा आधार म्हणून पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्या नागरिकांची संख्या आता वाढताना दिसत आहे.
पीएफआरडीएमार्फत राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस), अटल पेन्शन योजना या पेन्शनच्या योजना राबविल्या जात असतात. गतवर्षामध्ये या दोन्ही योजनांमधील खात्यांमध्ये २३ टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण खातेधारकांची संख्या वाढून ४ कोटी २४ लाखांवर पोहोचली आहे. गतवर्षामध्ये कोविडच्या संकटाचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनमुळे सुमारे सहा महिने सर्वच आर्थिक व्यवहार बंद राहिलेले असतानाही पेन्शन योजनांना मिळालेला प्रतिसाद लक्षणीय आहे. या वर्षामध्ये पेन्शन योजनांकडे असलेल्या रकमेमध्ये ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
३१ मार्चअखेर पेन्शन योजनांच्या व्यवस्थापनाखाली असलेली संपत्ती ५.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. नॅशनल पेन्शन स्कीमखाली जमा असलेल्या रकमेवर चांगला परतावा मिळत आहे. या वर्षामध्ये ११०० नवीन कंपन्या या योजनेमध्ये दाखल झाल्या आहेत. या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी करून घेतले आहे. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या कॉर्पोरेट क्षेत्राला १६ टक्के तर अन्य खातेधारकांना ३२ टक्के परतावा मिळाला आहे.
सरकारने सरकारी नोकऱ्यांव्यतिरिक्त अन्य नोकरदारांना पेन्शन मिळावी यासाठी त्यांनीच गुंतवणूक करून आपल्या वृद्धापकाळाची सोय करण्यासाठी पेन्शन योजना सुरू केल्या आहेत. पीएफआरडीएच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली असलेल्या या योजनांमधून ग्राहकांना चांगला परतावा मिळावा, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये नव्यानेच दाखल होत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही या नवीन पेन्शन योजनांमध्ये सहभाग घ्यावा लागत असतो. याशिवाय अन्य व्यावसायिकही या योजनांचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे वृद्धापकाळी पेन्शनच्या माध्यमातून उत्पन्न मिळत राहू शकते.
अटल पेन्शन योजनेत ७७ लाख नवीन ग्राहक
या वर्षामध्ये अटल पेन्शन योजनेमध्ये ७७ लाख नवीन ग्राहक सहभागी झाले असून या योजनेमधील वाढीचे प्रमाण ३३ टक्के आहे. आता या योजनेखालील खातेधारक २.८ कोटींवर पोहोचले आहेत. एनपीएस योजनेमध्ये ६ लाख नवीन ग्राहक दाखल झाले असून येत्या आर्थिक वषार्मध्ये ही संख्या १० लाखांवर नेण्याचा मनसुबा ठेवण्यात आला आहे. या योजनेतील ग्राहक वृद्धी ११ ते १२ टक्क्यांच्या दरम्यान आहे.