लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागास संपर्क साधावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 02:30 PM2020-10-01T14:30:18+5:302020-10-01T14:32:54+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी परिसरातील नागरिक, लहान मुले, महिला येतात. अशा सर्वांची नोंद ठेवून कोरोनाची लक्षणे दिसल्यास अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवा, असे आवाहन दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के यांनी केले.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी
परिसरातील नागरिक, लहान मुले, महिला येतात. अशा सर्वांची नोंद ठेवून कोरोनाची लक्षणे दिसल्यास अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवा, असे आवाहन दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के यांनी केले.
नांदूरशिंगोटे येथील ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टर व प्रशासन यांच्यात घेण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर सरपंच गोपाल शेळके, दीपक बर्के, नानासाहेब शेळके, भारत दराडे, अनिल शेळके, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रणाली दिघे, ए. बी. गांगुर्डे, लता कापरे, ग्रामविकास अधिकारी एस. डी.अहिरे आदी उपस्थित होते. नांदूरशिंगोटेसह दोडी बुद्रुक, मानोरी, कणकोरी परिसरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याने परिसरात सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क असून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी सुरू आहे. नांदूरशिंगोटे हे मध्यवर्ती ठिकाण असून येथे खाजगी दवाखान्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे परिसरातील विविध गावातील शेकडो नागरिक उपचारासाठी येथे येतात. अशातच एखाद दुसरा रुग्ण कोरोना बाधित असून शकतो. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहून असे रुग्ण आढळल्यास त्यांना तत्काळ रुग्णालयात पाठवून द्यावे व इतर रुग्णांची नोंद ठेवण्यात यावी, असेही डॉ. म्हस्के यांनी सांगितले.
रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती बाहेर कुठेही फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सरपंच गोपाळ शेळके यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. राधाकृष्ण सांगळे, वंदना सांगळे, डॉ. रवींद्र
आव्हाड, डॉ. संतोष सानप, डॉ. गौरी पवार, डॉ. शांताराम घुगे, डॉ. मेधने आदी उपस्थित होते.
नांदूरशिंगोटे आरोग्य उपकेंद्रात रुग्ण संख्या वाढती
दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअतंगर्त नांदूरशिंगोटे उपकेंद्र असून नांदूरसह मानोरी व कणकोरी या गावांचा समावेश आहे. तिन्ही गावांत अद्याप पर्यंत दीडशेच्या आसपास कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबर अखेरीस नांदूरशिंगोटेत 92 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 30 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मानोरीत 27 व कणकोरीत 19 रुग्ण बाधित आढळून आले आहे. तसेच नांदूरशिंगोटे येथील पाच, मानोरी व कणकोरी येथे प्रत्येकी तिघांचा कोरोनाने आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्क व सँनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.