छाजेडांच्या राजकीय भवितव्यासाठी संप
By admin | Published: December 20, 2015 12:15 AM2015-12-20T00:15:54+5:302015-12-20T00:26:41+5:30
एसटीत सुंदोपसुंदी : मान्यताप्राप्त संघटनेचा आरोप
नाशिक : एसटी कामगारांना २५ टक्के वेतनवाढ देण्याच्या मागणीसाठी इंटकने पुकारलेला संप हा फसवा असून, कामगारहिताऐवजी केवळ अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांच्या राजकीय भवितव्यासाठी करण्यात आल्याचा आरोप मान्यता प्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव प्रमोद भालेकर यांनी केला आहे़ संप मागे घेतल्यानंतर संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला आहे़
भालेकर यांनी सांगितले की, एसटी कामगारांना २०१२-१६ चा वेतनकरार रद्द करून २५ टक्के वेतनवाढ द्यावी, ही मागणीच चुकीची व फसवी आहे़ अयोग्य वेळ व बेकायदेशीरपणे करण्यात आलेला हा संप कामगारांचे व एसटीचे नुकसान करणारा तसेच प्रवाशांना वेठीस धरणारा आहे़ करार संपण्यास केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून कामगारांनी सर्व फायदे घेतल्यानंतर हा करार रद्द करून २५ टक्के वाढ करण्याची मागणीच हास्यास्पद आहे़
छाजेड विधान परिषदेचे आमदार व काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना हा करार झाला आहे़ त्यावेळी त्यांनी १० टक्के मागणी केली होती; मात्र संघटनेने १३ टक्के पगारवाढ मिळवून दिली़ विशेष म्हणजे १० टक्के पगारवाढीचे छाजेड यांनी कौतुकही केले होते़ इंटकचे हे आंदोलन म्हणजे कामगारांचे नसून काँग्रेस पक्षाचे आहे़ या आंदोलनात राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे, बसेसची हवा सोडणे हे प्रकार केल्याचा आरोपही संघटनेने केला़
यावेळी विभागीय अध्यक्ष बाबा वाक्चौरे, सचिव प्रमोद भालेकर, प्रादेशिक सचिव विजय पवार, प्रसिद्धी सचिव भूषण पाराशरे उपस्थित
होते़ (प्रतिनिधी)