कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केवळ कागदावरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:16 AM2021-02-25T04:16:51+5:302021-02-25T04:16:51+5:30
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येऊ लागल्यानंतरच्या गत दोन महिन्यात आरोग्य व वैद्यकीय यंत्रणा आपसूकपणे सुस्तावत गेल्याचे चित्र ...
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येऊ लागल्यानंतरच्या गत दोन महिन्यात आरोग्य व वैद्यकीय यंत्रणा आपसूकपणे सुस्तावत गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविल्या जात असलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या प्रमाणात घसरण होऊन बहुतांश कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केवळ कागदावरच होऊ लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण गत दोन महिन्यांपासून घटले होते. त्यामुळे अनेक कोविड सेंटर्स बंद करण्यासह कोरोना विरोधातील लढाईत योगदान देणाऱ्यांनी काहीसा सुस्कारा टाकला होता. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासून पुन्हा रुग्णवाढ दिसू लागल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. मात्र, काहीशा सुस्तावलेल्या यंत्रणेला पुन्हा कोरोना विरोधी लढ्यात सक्रिय करणे प्रशासनाला देखील अवघड जाऊ लागले. त्यामुळेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात कमी झाले. त्यामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये ट्रेसिंगच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याने हे प्रमाण १०-१२ वर आले आहे. मात्र, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण २० टक्क्यांच्या खाली जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना वैद्यकीय विभागाला देण्यात आल्या आहेत.
इन्फो
कोरोना काळात तब्बल ३५ जणांचे ट्रेसिंग
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्यांमध्ये देखील सुस्ती आली असून आता पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने त्याला गती देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर या कोरोना तीव्रतेच्या काळात रुग्णांशी संबंधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचे ठरले होते. त्यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या ३५ लोकांची तपासणी केली जात होती. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना नोव्हेंबरपासून यश मिळण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी राज्यात सर्वाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये नाशिक आघाडीवर होते.
इन्फो
आता केवळ कुटुंबाची तपासणी
कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची थर्मामीटर व ऑक्सिमीटर तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिकेच्या शिक्षकांच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या या मोहिमेत घरोघरी फक्त आकडेवारी संकलित करताना आजारांची माहिती घेतली जात आहे. परंतु, गंभीर आजारांची माहिती संकलित करताना कोरोना बाधित रुग्णांकडे दुर्लक्ष होते. घरोघरी भेटी दिल्यानंतर रुग्णांचे थर्मामीटर, ऑक्सीमीटरद्वारे तपासणी केली जात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सध्या तरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे हे प्रमाण कुटुंबातील व्यक्ती आणि शेजारच्या कुटुंबापुरते मिळून एकूण १०-१२ जणांपुरतेच मर्यादित झाले आहे.