सराफ बाजारात पाईपलाईनच्या सदोष कामामुळे दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:15 AM2021-05-09T04:15:21+5:302021-05-09T04:15:21+5:30
नाशिक : शहरातील सराफ बाजारासह अन्य भागात स्मार्ट सिटी अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे सुरू असून, त्यामुळे सदोष कामांचा फटका ...
नाशिक : शहरातील सराफ बाजारासह अन्य भागात स्मार्ट सिटी अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे सुरू असून, त्यामुळे सदोष कामांचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सराफ बाजार, कापड बाजार, दहीपूल या भागात गटारयुक्त पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने या संदर्भातील दोष तातडीने दूर करून शुध्द पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून गावठाण विकास कार्यक्रमांतर्गत शहरात सध्या कोट्यवधी रूपयांची कामे सुरू आहेत. मात्र, या कामांमधील चुकांचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. गेल्या गुरूवारी (दि. ६) दहीपूल परिसरात जेसीबीचा फटका बसून जलवाहिनी फुटली. ती दुरूस्त करेपर्यंत ऐन उन्हाळ्यात शेकडो लीटर पाणी वाया गेले. या संदर्भात युवा सेनेचे पदाधिकारी गणेश बर्वे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर आता हा प्रकार घडला आहे.
सराफ बाजार, गायधनी गल्ली, कापड पेठ आणि दहीपूल या भागात कंपनीच्या कामातील काहीतरी गोंधळामुळे नागरिकांना सकाळ, सायंकाळ दूषित पाणी येत असून, हे पाणी गटाराचे असावे, असा नागरिकांचा संशय आहे. पाणी दूषित असल्याने रोगराईची शक्यता गृहित धरून नागरिकांना या पाण्याचा वापर करता येत नाही. पिण्यासाठी तर पाण्याचे जार विकत घ्यावे लागत आहेत. त्यामुळे स्वयंपाकाचे ठीक परंतु अन्य कारणांसाठीदेखील पाणी वापरणे कठीण झाले आहे. या संदर्भात या भागात महापालिका आणि स्मार्ट सिटीने लक्ष पुरवून पाण्याचा प्रश्न त्वरित सेाडवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कोट...
परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून गटाराच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिकांना हे पाणी पिता येत नाही किंवा वापरताही येत नाही. सध्या कोरोनामुळे आधीच अनारोग्याचे दिवस आहेत. त्यात आणखी भर पाडू नये आणि त्वरित पाणीप्रश्न सोडवावा.
- कृष्णा नागरे, स्थानिक रहिवासी.
इन्फो...
युवा सेनेची मागणी
गंगापूर धरणातील साठा कमी होत असल्याने पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. अशावेळी स्मार्ट सिटीच्या हलगर्जीपणामुळे जलवाहिनी फुटण्याचा प्रकार घडला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेचे विद्यापीठ उपाध्यक्ष गणेश बर्वे यांनी केली आहे.
-------
छायाचित्र आर फोटाेवर ०८ वॉटर
===Photopath===
080521\08nsk_38_08052021_13.jpg
===Caption===
सराफ बाजार परीसरात सुरू असलेले जलवाहीनीचे काम