दूषित पाणीपुरवठ्याने आरोग्य धोक्यात
By Suyog.joshi | Published: June 6, 2024 04:56 PM2024-06-06T16:56:41+5:302024-06-06T16:57:50+5:30
जुन्या नाशकात मागील काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाला याबाबत ...
जुन्या नाशकात मागील काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाला याबाबत कल्पना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दूषित पाणीपुरवठा थांबला नाही, तर मनपावर मोर्चा काढत जाब विचारला जाईल, असा इशारा काँग्रेस सेवादल शहराध्यक्ष डाॅ. वसंत ठाकूर यांनी दिला आहे. जुन्या नाशिकमधील पाटील गल्ली, बुधवार पेठ, संभाजी चौक, गजराज चौक, कुंभारवाडा, काझी गडी, नानावली, फकीरवाडी, कथडा, छपरीची तालीम, नाईकवाडी, चव्हाटा, पेठ म्हसरूळ टेक, तांबट लाइन या भागामध्ये सतत दूषित मातीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे.
आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना त्यातही दूषित गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. वरील भागात अनेक ठिकाणी लहान मुलं व वयोवृद्ध नागरिक आजारी पडले आहेत. लहान मुलांमध्ये काॅलरा, डायरिया याची साथ पाहायला मिळत आहे. दूषित पाणीपुरवठा त्वरित थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सेवा दलामार्फत देण्यात आला.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली जागोजागी खोदकाम करून पाण्याच्या पाइपलाइन फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची गळती सुरू आहे. दुसरीकडे कमी दाबाने पाणी नागरिकांना द्यायचे आणि तेही दूषित पाणीपुरवठा. हे थांबले पाहिजे.
-- डॉ. वसंत ठाकूर, शहराध्यक्ष, काँग्रेस सेवा दल