पंचवटी परिसरात दूषित पाणीपुरवठा
By admin | Published: May 10, 2016 10:42 PM2016-05-10T22:42:18+5:302016-05-11T00:43:10+5:30
आरोग्य धोक्यात : मनपाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
पंचवटी : परिसरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात ठरवून दिलेल्या वेळेत पाणीपुरवठा होत असला तरी सध्या नागरिकांना बेचव पाणी प्राशन करावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून नळाला खराब पाणी तर येतेच, शिवाय ते अत्यंत बेचव लागत असल्याने सदर पाणी प्यावे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मातीमिश्रित व बेचव पाणी प्राशन केल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पंचवटी परिसरातील काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असला तरी याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाने तत्काळ दखल घेत नागरिकांना कारण स्पष्ट करावे तसेच जलवाहिनीला गळती लागलेली असेल तर तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
धरणातील जलसाठा कमी झाल्याने प्रशासनाकडून पाणीकपात सुरू केल्याने पिण्याच्या पाण्याची काही प्रमाणात टंचाई भासू लागली आहे. त्यातच सध्या दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. (वार्ताहर)