वडाळा गावात दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:13 AM2021-04-18T04:13:31+5:302021-04-18T04:13:31+5:30
मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून दररोज पाणीपुरवठा केला जातो. मात्र, काही दिवसांपासून नळांना येणाऱ्या पाण्याला मातीमिश्रित पिवळसर रंग असल्याचे दिसून येत ...
मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून दररोज पाणीपुरवठा केला जातो. मात्र, काही दिवसांपासून नळांना येणाऱ्या पाण्याला मातीमिश्रित पिवळसर रंग असल्याचे दिसून येत आहे, तर काही भागामध्ये अत्यंत गढूळ स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दूषित पाण्यावाटे पसरणाऱ्या आजारांची साथ यामुळे येण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. वडाळा गाव परिसरातील विविध भागांमधील पाण्याचे नमुने तपासून पाणीपुरवठा शुद्ध स्वरूपात कसा करता येईल, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वडाळा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभामध्ये गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावरून पाण्याचा भरणा केला जातो. त्यानंतर या जलकुंभामधून सकाळी गावात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. मागील आठवड्यापासून वडाळा गावातील रामोशीवाडा, माळी गल्ली, राजवाडा, तैबानगर, जय मल्हार कॉलनीचा परिसर आदी भागांत नळांना दूषित पाणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे काही नागरिकांना पोटदुखी, अतिसाराची लक्षणे दिसू लागली आहेत. यामुळे दूषित पाण्यावाटे पसरणाऱ्या आजारांची भीती व्यक्त केली जात आहे.