वामनदादांच्या अप्रकाशित साहित्यावर विचारमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:19 AM2021-08-21T04:19:02+5:302021-08-21T04:19:02+5:30
लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी आयुष्यभर समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी भारतीय संविधानिक मूल्यांसह बुद्ध-कबीर, तुकोबा, ...
लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी आयुष्यभर समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी भारतीय संविधानिक मूल्यांसह बुद्ध-कबीर, तुकोबा, शिवबा, फुले-शाहू-आंबेडकरांचा सामाजिक प्रबोधनाचा विचार आपल्या शाहिरीतून जनमानसात रुजवला. वामनदादांच्या जन्मशताब्दीनिमित्त संविधानिक विचार मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी देशवंडी ग्रामस्थ व लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे.
देशवंडी येथे पार पडलेल्या अभिवादन कार्यक्रमात विविध ठराव एकमताने संमत करण्यात आले. वामनदादांच्या साहित्याचा शालेय तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करावा, लोककवी वामनदादा कर्डक प्रबुद्ध कला विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी, देशवंडी येथील स्मारकाची सुशोभीकरण करून तेथे अभ्यासिका-वाचनालय-व्यायामशाळा-गेस्ट हाउस-मेडिटेशन हॉल आदी व्यवस्था करावी, देशवंडी येथील जिल्हा परिषद आणि नाईक शिक्षण संस्थेच्या शाळेस वामनदादांचे नाव द्यावे, देशंवडीला पर्यटन केंद्राचा दर्जा देऊन मूलभूत सुविधा पुरवाव्यात आदींचा त्यात समावेश आहे.
यावेळी सरपंच दत्ताराम डोमाडे, प्रतिष्ठानचे प्रा. शरद शेजवळ, भाऊसाहेब कापसे, नितीन रणशूर, सुभाष बरके, ज्ञानेश्वर कर्डक, विठ्ठल चकने, ज्ञानेश्वर बरके, योगेश कापडी, सतीश कापडी, चंदू कापडी, उमेश कापडी, देवीदास कर्डक, किशोर सोनवणे, मधुकर कर्डक, संजय कर्डक, विष्णू सानप, साहिल कर्डक, भाऊसाहेब कर्डक, दीपक कर्डक, लता सोनवणे, अरुणा आंबेडर, साळूबाई नागरे, सत्यभामा कर्डक, मंजुळा कर्डक, सोनल कर्डक आदी उपस्थित होते, तर ऑनलाइन कार्यक्रमात राज्यातून मान्यवर सहभागी झाले होते.
चौकट-
वामनदादांचे साहित्य-कवण म्हणजे संविधान विचारमूल्यांचा बोधीवृक्ष आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात संविधानिक विचार मूल्य रुजवले जाणे आवश्यक आहे. हे मूल्य-विचार तसेच सामाजिक प्रबोधनाचे गीत नव्या पिढीपर्यंत पोहचविणे शाहीर कलावंतांच्या माध्यमातून शक्य आहे.
-प्रा. शरद शेजवळ, संस्थापक कार्याध्यक्ष,
लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान