शिरसाणे येथील कुटुंबाची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:14 AM2021-03-19T04:14:32+5:302021-03-19T04:14:32+5:30
- शैला सूर्यभान मांदळे, शिरसाणे, चांदवड शेतीमालाचे कोसळलेले दर आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे माझे वडील भाऊसाहेब खालकर यांच्यावर ...
- शैला सूर्यभान मांदळे, शिरसाणे, चांदवड
शेतीमालाचे कोसळलेले दर आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे माझे वडील भाऊसाहेब खालकर यांच्यावर सरकारी आणि सावकारी कर्ज वाढल्यामुळे कर्जबाजारी पणाला कंटाळून त्यांनी दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली. नऊ लाख रुपये कर्ज होते आणि सरकारकडून अवघे एक लाख रुपये मदत मिळाली. आज मी पेट्रोल पंपावर काम करत आहे तर आई दुसऱ्याच्या शेतात मजुरी करत आहे. घरचा कमवता आधार गेल्यामुळे मला कमी वयात काम करावं लागत आहे. शासन निव्वळ आश्वासन देते, प्रत्यक्ष मात्र तुटपुंजी मदत करून थट्टा करते, समाजात असे खूप आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे की ज्यांचे संसार उघड्यावर आहे.
-प्रवीण खालकर, औरंगपूर
माझे पती रामेश्वर कदम यांनी कर्जाला कंटाळून मागील वर्षी आत्महत्या केली. कर्जाचा अजूनही डोंगर माथ्यावर आहे. एका कन्येचे लग्न झाले आहे तर लहान मुलगी कंपनीत कामाला जाते. मुलगा बारावीत शिकतो. मी घरीच असते. त्यामुळे अल्प उत्पन्नात घर कसे चालवावे असा प्रश्न पडतो. निफाड तहसीलदारांनी एक लाखांची मदत केली. ती तुटपुंजी आहे. शासनाने आमचा विचार करावा, बँकांनी वसुलीसाठी तगादा सुरू केला आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब चालविणे कठीण झाले आहे.
- -मनीषा रामेश्वर कदम, बाणगंगानगर, ओझर