२७० नवसैनिकांची तुकडी देशसेवेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:17 AM2021-08-29T04:17:07+5:302021-08-29T04:17:07+5:30
शनिवारी उगवत्या दिनकराच्या साक्षीने येथील उमराव मैदानावर लष्करी बॅन्ड पथकाने वाजविलेल्या विशिष्ट अशा लष्करी धूनच्या चालीवर नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र ...
शनिवारी उगवत्या दिनकराच्या साक्षीने येथील उमराव मैदानावर लष्करी बॅन्ड पथकाने वाजविलेल्या विशिष्ट अशा लष्करी धूनच्या चालीवर नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत उपस्थित वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना ‘सॅल्यूट’ केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवळालीच्या स्कूल ऑफ आर्टीलरीचे मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल अजय सूद उपस्थित होते. तसेच केंद्राचे कमांडर ब्रिगेडियर ए.रागेश यांनी सूद यांचे स्वागत केले. या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी खुल्या जिप्सी वाहनातून मैदानावरील संचलनाची पाहणी केली. यावेळी नवसैनिकांनी राष्ट्रध्वज व विविध तोफांच्या साक्षीने आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांना मानवंदना दिली.
दरम्यान, यावेळी प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट अशी कामगिरी करणाऱ्या काही नवसैनिकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये अष्टपैलू कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट नवसैनिक म्हणून निखिल शर्मा या जवानाला सन्मानित केले गेले.
--इन्फो--
नवसैनिकांकडून शहिदांना नमन
‘भारत माता की जय’ अशी घोषणा देत या नवसैनिकांच्या तुकडीने येथील शहीद स्मारकावर नतमस्तक होत देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांना नमन केले. ४२आठवड्यांच्या खडतर आणि अवघड असे प्रशिक्षण पूर्ण करताना प्रत्येक नवसैनिक दीक्षांत सोहळ्याची आतुरतेने वाट बघत असतो. हा दिवस त्यांच्यासाठी जणू सोनेरी क्षण घेऊन आलेला असतो, आपल्या लष्करी सेवेतील अविस्मरणीय क्षणांपैकी एक क्षण म्हणून याकडे नवसैनिकांकडून बघितले जाते. संचलनानंतर नवसैनिकांचा उत्साह बघण्यासारखा होता.
--इन्फो--
यंदाही पालक सोहळ्याला मुकले
४२आठवडे आपल्या मुलाला आपल्यापासून लांब ठेवल्यानंतर सैनिकाच्या वर्दीमध्ये त्याची रुबाबदार छबी दीक्षांत सोहळ्यात अनुभवण्यासाठी आतुर असलेल्या माता-पित्यांसह पालकांना यावेळी उपस्थित राहता आले नाही. कोरोनाच्या सावटामुळे पालकांना या सोहळ्यासाठी केंद्राकडून निमंत्रित करण्यात आले नव्हते. यामुळे त्यांना सन्मान करण्यात येणारे ‘गौरव पदक’देखील लष्करी अधिकाऱ्यांकडून नवसैनिकांकडेच सुपूर्द केले गेले.
280821\28nsk_9_28082021_13.jpg~280821\28nsk_10_28082021_13.jpg
भारतमातेच्या संरक्षणासाठी पडते पाऊल पुढे : भारतीय तोफखाना केंद्रात पार पडलेल्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी लष्करी थाटात संचलन करणाऱ्या नवसैनिकांकडून मानवंदना स्वीकारताना वरिष्ठ लष्करी अधिकारी ~भारतमातेच्या संरक्षणासाठी पडते पाऊल पुढे : भारतीय तोफखाना केंद्रात पार पडलेल्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी लष्करी थाटात संचलन करणाऱ्या नवसैनिकांकडून मानवंदना स्वीकारताना वरिष्ठ लष्करी अधिकारी