कांदा लिलाव सुरू ठेवल्याने धमकी; विंचूरला कांदा व्यापाऱ्यांचा रास्ता रोको
By धनंजय वाखारे | Published: October 2, 2023 02:08 PM2023-10-02T14:08:47+5:302023-10-02T14:08:59+5:30
संबंधित व्यापाऱ्यास अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
विंचूर (नाशिक) : व्यापाऱ्यांचा बेमुदत संप असतानाही कांदा लिलाव सुरू ठेवल्याने विंचूरच्या व्यापाऱ्यांना तसेच उपबाजार समितीस जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचा पदाधिकारी असलेल्या व्यापाऱ्याने शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिल्याच्या निषेधार्थ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे यांसह येथील कांदा व्यापाऱ्यांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता नाशिक छ. संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. संबंधित व्यापाऱ्यास अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी असलेल्या कापडणीस नामक कांदा व्यापाऱ्याने कांदा लिलाव सुरू ठेवण्याचा जाब विचारत विंचूर येथील व्यापाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिली. तसेच बाजार समिती व संचालकां बाबद अपशब्द वापरले. सदर संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने येथील संतप्त व्यापाऱ्यांनी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. धमकी देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विंचूर उप बाजारात कांदा लिलाव सुरू आहेत. येथील व्यापारी व बाजार समितीस अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ आंदोलन करीत आहोत. संबंधित व्यापाऱ्यास तत्काळ अटक करण्यात यावी.
- पंढरीनाथ थोरे, माजी सभापती तथा विद्यमान संचालक लासलगाव बाजार समिती