राखीव जागेवरील अतिक्रमण हटवा मागणीसाठी उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:15 AM2021-03-17T04:15:06+5:302021-03-17T04:15:06+5:30
येवला : तालुक्यातील बोकटे येथील श्री काल भैरवनाथ यात्रोत्सव राखीव जागेवरील अतिक्रमण हटवा या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते ...
येवला : तालुक्यातील बोकटे येथील श्री काल भैरवनाथ यात्रोत्सव राखीव जागेवरील अतिक्रमण हटवा या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते सीताराम दाभाडे, सखाहरी दाभाडे, प्रकाश दाभाडे, सोमनाथ दाभाडे, संदीप दाभाडे यांनी सोमवारी (दि. १५) उपोषण सुरू केले आहे. बोकटे येथे दरवर्षी श्री काल भैरवनाथ यात्रोत्सव भरतो. या यात्रोत्सवासाठी नाशिकसह नगर, औरंगाबाद जिल्ह्यांतील भाविक व विविध व्यावसायिक येत असतात. यात्रोत्सवासाठी बोकटे ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध केलेली होती. मात्र, या जागेवर मोठ्या प्रमाणात विनापरवानगीने अतिक्रमण झाल्याने यात्रेसाठी असणारी राखीव जागाच शिल्लक राहिलेली नाही. हे अतिक्रमण हटवण्याची मागणी बोकटे, देवळाणे, दुगलगाव येथील भाविक व ग्रामस्थांनी केली होती, तर अतिक्रमण न हटवल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणधारकांना सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.
अतिक्रमण प्रश्नी निवेदन देणाऱ्या संबंधितांनी कार्यवाहीबाबत लेखी खुलासा केला नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणास प्रारंभ केला आहे. (१५ येवला बोकटे)