एक दिवसाआड एका सत्रात बाजार समित्या सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:15 AM2021-05-13T04:15:17+5:302021-05-13T04:15:17+5:30
हवामान खात्याने पूर्व मोसमी पावसाचा अंदाज दिलेला असल्याने कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळींची सुविधा नसलेल्या कांदा उत्पादकांचा कांदा आजही शेतात ...
हवामान खात्याने पूर्व मोसमी पावसाचा अंदाज दिलेला असल्याने कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळींची सुविधा नसलेल्या कांदा उत्पादकांचा कांदा आजही शेतात उघड्यावर पडलेला आहे. अशा शेतकऱ्यांना त्यांचा कांदा आता विक्री करता न आल्यास बेमोसमी व पूर्वमोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका आहे.
त्यामुळे सलग १० दिवस बाजार समित्या बंद राहिल्यास पुन्हा बाजार समित्या सुरू झाल्यावर सर्वच बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होऊन बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरतील व त्याचा कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसेल. त्यामुळे सर्व नियम व अटींचे पालन करून, तसेच बाजार समितीत कांदा विक्रीसाठी एका वाहनासोबत एकाच शेतकऱ्यास येण्याची परवानगी देऊन किमान एकादिवसाआड कांद्याचे लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.