ब्रिटिश राजवटीपासून इंग्रजी साहित्याचे अनुकरण सुरू
By admin | Published: February 15, 2015 01:00 AM2015-02-15T01:00:10+5:302015-02-15T01:01:45+5:30
ब्रिटिश राजवटीपासून इंग्रजी साहित्याचे अनुकरण सुरू
नाशिक : मराठी साहित्याचा पाया असणाऱ्या संत साहित्याला ब्रिटिश काळापासून वाईट दिवस आले. तत्पूर्वी ज्ञानदेवांपासून ते निळूबारायांपर्यंत सर्वच संतांनी जगण्याविषयीचे तत्त्वज्ञान सोप्या भाषेत मांडले होते. ते घराघरात पोहोचले होते, परंतु ब्रिटिश राजवटीपासून इंग्रजी साहित्याचे अनुकरण सुरू झाल्याने संतसाहित्याची पीछेहाट झाल्याचे मत ८८व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाशिक जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नीलिमा पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, लक्ष्मीचंद्र शेंडे, मविप्र संस्थेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सभापती नितीन ठाकरे, केशव पाटील, त्र्यंबक गायकवाड आदि उपस्थित होते. ते म्हणाले संतसाहित्य मराठी साहित्याचा पाया आहे. वर्तमानकाळाचा अभ्यास करून अध्यात्माद्वारे त्यावर मार्गदर्शन करण्याचे काम संतांनी केले. राज्याची संस्कृती व्यापक आहे, तिची जडणघडणही संतांनीच केली. संतांनी त्यांच्या काळात साहित्यातून वर्तमानकाळातील परिस्थितीवर प्रहार केले. संत निवृत्तिनाथांपासून ते निळोबारायांपर्यंत सर्वांनीच साहित्य घराघरांत पोहोचविले. १३व्या शतकात स्थापन झालेल्या भागवत धर्माने जाती पाती तोडत नव्या धर्माची स्थापना केली. त्यात अनेक पंथांच्या आणि धर्माच्या लोकांनी त्यात प्रवेश केला. त्यानंतर भेदभावाची तीव्रता कमी झाली होती, संतसाहित्याच्या विचारांची ती क्रांती होती. त्यानंतर पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याचा विस्तार झाल्यानंतर संतसाहित्यावर आधारितच लावण्या तयार होऊ लागल्या. तोपर्यंत संतसाहित्य घराघरात होते. परंतु त्यानंतर इंगजांबरोबर आलेल्या त्यांच्या साहित्याचे अनुकरण मराठी साहित्यात होऊ लागल्याने तेव्हापासूनच संतसाहित्याकडे दुर्लक्ष झाल्याचे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले. त्यानंतरही स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची आरती, प्रार्थना समाजाची तत्त्वे यांच्यामध्येही संतसाहित्याचाच वारसा दिसून आला. त्यामुळे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकावर संतसाहित्याचेच संस्कार होत असतात, असे माझे मत असल्याचेही ते म्हणाले. मी संतसाहित्याबरोबरच आधुनिक साहित्याचाही लेखक आहे. त्यामुळे संतसाहित्यिकाच्या दृष्टीतून आधुनिक पद्धतीचे लिखाण करताना मी दोन्हीकडे समतोल साधतो असेही ते म्हणाले.
प्रारंभी दामोदर गावले यांनी प्रास्तविक केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी परिचय करून दिला. वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त मारुतीबुवा कुऱ्हेकर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष नीलिमा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. विनायकदादा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)