मार्चअखेरीस ग्राहक आयोग खंडपीठाचे कामकाज सुरू
By Admin | Published: January 31, 2015 01:02 AM2015-01-31T01:02:23+5:302015-01-31T01:02:55+5:30
- आर. सी. चव्हाण
नाशिक : राज्य शासनाने मंजूर केलेले राज्य ग्राहक आयोग खंडपीठाच्या कामकाजास मार्चअखेरपासून सुरुवात होण्याची शक्यता मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष आऱ सी़ चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली़ नागरिकांच्या तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून, ग्राहकांनी आपल्या तक्रारी संकेतस्थळावर नोंदविल्यास त्याचा फायदा होणार आहे़ तसेच आॅनलाइन तक्रारी आणि ई-फायलिंग यासाठी तज्ज्ञांच्या मदत मिळावी यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले़
चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, बँक आणि विमा क्षेत्रातील कंपन्यांना आॅनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी सूचना केल्या जाणार आहेत़ यामुळे ग्राहक कंपन्यांकडे आॅनलाइन तक्रार नोंदवतील तसेच ते वरिष्ठांकडेही तक्रारी मांडू शकतात़ या तक्रारीनंतरही ग्राहकांचे समाधान न झाल्यास कंपनीच राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचात ग्राहकाची तक्रार दाखल करतील़ त्यात ग्राहकाची तक्रार आणि कंपनीने ग्राहकांना दिलेले उत्तरही जोडण्यात येईल़ याचा न्यायालय व पक्षकार या दोघांनाही फायदा होईल व ग्राहकांनाही त्वरित निकाल देण्यात येईल़
या पेपरलेस कारभारामुळे पक्षकार, वकील आणि न्यायालयाच्या वेळ आणि पैशांचीही बचत होऊन विश्वास वाढेल़ याबरोबरच न्यायालय ई -पेमेंटसाठीही आग्रही असून, राष्ट्रीयीकृत बँकेच्या मदतीने पक्षकारास किंवा न्यायालयात आर्थिक व्यवहार थेट आॅनलाइन पद्धतीने करता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत़
ग्राहक न्यायालयाच्या प्रत्येक कामकाजासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची ई-फायलिंग करण्याचा मानस असून, यामुळे जितका जास्त इंटरनेट, स्मार्टफोन, कॅमेरा या तंत्रज्ञानाचा वापर होईल तितके काम जलद होईल़ मात्र यासाठी
व्यापक स्वरूपात जनजागृती करण्ये गरजेचे असल्याचेही चव्हाण
म्हणाले़ (प्रतिनिधी)