महापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:06 PM2018-04-23T12:06:26+5:302018-04-23T12:07:19+5:30
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्टयातील शेतजमिनीसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीच्या विरोधात पालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ‘मी नाशिककर’च्या टोप्या घालून आंदोलकांनी करवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे शिवाय भजनाच्या माध्यमातूनही आपल्या तिव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी भाजीपाला सोबत आणत आंदोलनात सहभाग नोंदविला आहे.
तुकाराम मुंढे यांनी करवाढीचा निर्णय घेतल्याने नाशिककरांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. सदर करवाढ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांसह व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांचे मेळावे होऊन जागृतीचे प्रयत्न सुरू होते. सत्ताधारी भाजपातही या करवाढीविरोधी अस्वस्थता निर्माण होऊन सोमवारी (दि.२३) त्यावर चर्चा करण्यासाठी विशेष महासभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण कृति समितीच्यावतीने सकाळपासूनच महापालिका मुख्यालयासमोर नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. ‘मी नाशिककर’ या बॅनरखाली एकवटलेल्या या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिका-यांबरोबरच विविध उद्योग, व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारीही सहभागी झाले आहेत. याचवेळी भजन करत आयुक्तांच्या निर्णयाचा निषेध केला जात आहे. महापालिका मुख्यालयासमोरच आंदोलकांनी गर्दी करण्यास सुरुवात केल्याने शरणपूर रस्त्यावरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातही घोषणाबाजी होत आहे. करवाढ रद्द झालीच पाहिजे अन्यथा पालिकेला वेढा घालण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
आयुक्त राहणार गैरहजर
करवाढीविरोधी चर्चा करण्यासाठी महापौरांनी आज दुपारी विशेष महासभा आयोजित केली आहे. या महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता असून प्रसंगी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठरावही येण्याची चिन्हे आहेत. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज रजेचा अर्ज प्रशासनाला दिल्याने मुंढे उपस्थित राहणार नाहीत. परिणामी, मुंढेंच्या अनुपस्थितीत आजची महासभा होणार आहे.