नाशिकमध्ये संततधार : पहाटेपासून पावसाला सुरूवात उपनगरीय भागांमध्ये सकाळी वाढला जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 02:14 PM2017-08-27T14:14:47+5:302017-08-27T14:21:02+5:30
आज पहाटेपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्याप्रमाणे सुरूवात झाली आहे. ग्रामिण भागामध्ये मुसळधार तर शहरी भागात संततधार पाऊस सुरू झाला आहे.
नाशिक : आज पहाटेपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्याप्रमाणे सुरूवात झाली आहे. ग्रामिण भागामध्ये मुसळधार तर शहरी भागात संततधार पाऊस सुरू झाला आहे. नाशिकमध्ये पहाटे सुरू झालेल्या पावसाने सकाळी जोर धरला. शहरात संततधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडविली. रविवार असल्यामुळे शाळा-महाविद्यालयांसह शासकिय तसेच बहुतांश खासगी कार्यालयांना सुटी असल्यामुळे विद्यार्थी व चाकरमान्यांचे हाल झाले नाही; मात्र खासगी शिकवणीसाठी बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींची पावसामुळे गैरसोय झाली. संततधार पावसाने उपनगरांसह शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरही पाणी साचले होते. गटारींची अवस्था अद्यापही बिकट असल्यामुळे नाशिकच्या रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसून रस्त्यावर तलाव साचत असल्याचे चित्र आहे. बहुसंख रस्त्यांची पावसामुळे दैनावस्था झाली असून कच पसरली आहे. तसेच रस्त्यांना खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुणे महामार्गावर नेहरुनगर, उपनगर, गांधीनगर, आंबेडकरनगर, बोधलेनगर या परिसरात खड्डयांमुळे चाळण झाली आहे. महामार्ग असूनही रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वडाळागाव, अशोका मार्ग, जुने नाशिक, सिडको, इंदिरानगर या भागात देखील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे.
गंगापूर धरणातून विसर्ग सुरू
शहरासह ग्रामिण भागातही पावसाचा जोर वाढल्यामुळे गंगापूर धरणातूनदेखील विसर्ग वाढविण्यात आला आहे. शनिवारी दिवसभर साडेपाचशे क्युसेकने विसर्ग सुरू होता. पहाटेनंतर अडीचशे क्युसेकने वाढ झाली .आज दुपारी बारा वाजेपर्यंत ७८६ क्युसेक विसर्ग सुरू होता; मात्र पावसाचा जोर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढल्यामुळे विसर्ग आठशे क्युसेकने वाढविण्यात आला असून सध्या दीड हजार क्युसेक पाणी नदीपात्रात धरणातून प्रवाहित करण्यात आले आहे. धरणातून जरी दीड हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असलातरी शहरात होणाºया पावसामुळे रस्त्यांवरुन वाहून जाणारे व नाल्यामधील पाण्यामुळे गोदावरीच्या पातळीत रामकुंडापासून पुढे अधिक वाढ झाली आहे. अहल्यादेवी होळकर पूलाखालून सुमारे दोन ते अडीच हजार क्युसेक पाणी पुढे रामकुंडात प्रवाहित आहे.
गोदाकाठावर शुकशुकाट...
पावसामुळे गोदाकाठावर सकाळपासून शुकशुकाट पहावयास मिळत आहे. येथील बहुतांश विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवला आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाचा विसर्ग वाढीची शक्यता लक्षात घेत व्यावसायिकांनी सतर्कता बाळगली आहे.