पावसाची संततधार, गंगापूर धरण निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 01:52 AM2022-07-11T01:52:11+5:302022-07-11T01:52:33+5:30
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ५० टक्केच्याजवळ पोहोचले आहे, तर दारणा धरण ६५ टक्के भरल्याने धरणातून सुमारे ५६८८ क्युसेकने विसर्ग केला जात आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने अवघ्या तीन दिवसांमध्ये धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान, पावसाचा अंदाज लक्षात घेऊन गंगापूर धरणातून विसर्ग करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
नाशिक: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ५० टक्केच्याजवळ पोहोचले आहे, तर दारणा धरण ६५ टक्के भरल्याने धरणातून सुमारे ५६८८ क्युसेकने विसर्ग केला जात आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने अवघ्या तीन दिवसांमध्ये धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान, पावसाचा अंदाज लक्षात घेऊन गंगापूर धरणातून विसर्ग करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
जिल्ह्यात उशिरा वरुणराजाने वर्दी दिली आणि संततधार पावसाचा अभिषेक सुरू असल्याने धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. सध्यस्थितीत दारणा, नांदुरमध्यमेश्वर आणि मुकणे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजा सुखावला आहे. तर धरणातील साठ्यात वाढ होऊ लागल्योन शहरवासीयांवरील पाणीकपातीचे संकटही दूर झाले आहे.
जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याचे संकट अधिक बिकट होत असल्याने सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती. गेल्या दहा दिवसांपासून राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असतांना नाशिकला मात्र पावसाने पाठ फिरविल्याने दिवसेंदिवस धरणसाठाही घटत होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे मोठे संकट येण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून संततधार पावसाला सुरुवात झाल्याने नाशिककर सुखावले. जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झाला नसला, तरी संततधार पावसानेही धरणातील पाणीसाठा वाढला आहे.
रविवारी (दि. १०) दुपारपर्यंत गंगापूर धरणातील पाणीसाठा ४९ टक्केपर्यंत पाेहोचला आहे, तर समूहातील काश्यपी, गौतमी, गोदावरी आणि आळंदी धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे समूहातील पाणीसाठाही ४० टक्के इतका झाला आहे.
--इन्फो--
दारणातून ५६८८ क्युसेक विसर्ग
दारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ६५ टक्केच्या पुढे गेला असून, धरणातून साडेसहा हजार क्युसेक वेगाने विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह कायम राहिल्यास रात्रीतून विसर्ग देखील वाढविला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
--इन्फो--
गंगापूर धरणातून अद्याप विसर्ग नाही
गंगापर धरण जवळपास ५० टक्के भरले असले, तरी अद्याप धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. धरणक्षेत्रात सातत्याने बरसणाऱ्या पावासामुळे धरणाची पातळी झपाट्याने वाढत असल्याने पावसाची परिस्थिती पाहून विसर्ग करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या तीन दिवसांत धरणात १९ टक्कयांनी वाढ झालेली आहे.