कंत्राटास मंजुरी : काटेकोर अंमलबजावणीचे प्रशासनाला आदेश
By admin | Published: September 1, 2016 12:44 AM2016-09-01T00:44:11+5:302016-09-01T00:45:15+5:30
शहरात धावणार नवीन घंटागाड्या
नाशिक : दोन वर्षांपासून मुदतवाढीच्या घेऱ्यात अडकलेल्या आणि विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या घंटागाडीच्या कंत्राटास महापालिका स्थायी समितीने अखेर बुधवारी झालेल्या सभेत हिरवा कंदील दाखविला. स्थायी समितीने दिलेल्या मंजुरीमुळे लवकरच शहरात नवीन घंटागाड्या रस्त्यावर धावताना बघायला मिळणार आहेत. पाच वर्षांसाठी १७६ कोटी रुपयांच्या या कंत्राटास मान्यता देतानाच सभापती सलीम शेख यांनी घंटागाडी सुव्यवस्थित चालविण्याची जबाबदारीही प्रशासनावर निश्चित करत अटी-शर्तींनुसार काटेकोरपणे अंमलबजावणीचे आदेश दिले.
स्थायी समितीच्या सभेत घंटागाडीच्या कंत्राटासंबंधी सुमारे तीन तास चर्चा झडली. सदस्यांनी काळ्या यादीत टाकलेल्या घंटागाडीच्या ठेकेदारांना पुन्हा ठेका देण्यास विरोध करतानाच अटी-शर्तींच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित केल्या. आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्यावरही आरोप करण्यात आले. चर्चेअंती सभापती सलीम शेख यांनी निर्णय देताना सांगितले, शहर स्वच्छता ही महापालिकेची प्रमुख जबाबदारी आहे. दोन वर्षांपासून घंटागाडीचा ठेका मुदतवाढीत अडकलेला आहे. मुदतवाढीच्या या खेळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होता कामा नये. घंटागाडीचा नव्याने ठेका देण्याची प्रक्रिया तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या काळात राबविण्यात आली. घंटागाडी अनियमित येणे, कचरा वेळेत उचलला न जाणे यांसारख्या तक्रारी वारंवार येत असतात. त्यामुळेच आयुक्तांनी घंटागाडीचा नव्याने ठेका देताना काही कडक अटी-शर्ती निविदेत नमूद केल्या आहेत.