सार्वजनिक बांधकाम खात्यात ठेकेदारांच्या बिलांचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:50 AM2017-12-13T01:50:29+5:302017-12-13T01:51:46+5:30
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कामे घेणारे ठेकेदारांचे संगमनत आजवर सर्वश्रुत असून, त्यात आता नवीन प्रकरणाची भर पडली आहे.
नाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कामे घेणारे ठेकेदारांचे संगमनत आजवर सर्वश्रुत असून, त्यात आता नवीन प्रकरणाची भर पडली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात आलेल्या शेकडो कामांच्या मोजमाप पुस्तिकाच (एम.बी.) गायब झाल्या असून, परिणामी झालेल्या (?) कामांबाबत शंका निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मोजमाप पुस्तिका ताब्यात ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाºयांची असताना अनेक वर्षे उलटूनही त्यांनी मोजमाप पुस्तिका जमा न केल्याने त्यांना स्मरणपत्रे पाठवूनही उपयोग होत नसल्याचे पाहून कार्यकारी अभियंत्यांनी आता त्या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा इशाराच दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग व इतर शासकीय विभागांची विकासकामे करून घेतली जातात. संपूर्णत: बांधकाम खात्याच्या नियंत्रणाखाली ठेकेदारांकरवी करून घेतल्या जाणाºया कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सुरू होणाºया प्रत्येक कामाची कामनिहाय नोंद ठेवणारी मोजमाप पुस्तिका ठेवली जाते. त्या त्या कामाची जबाबदारी सोपविलेल्या कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहायक अभियंत्यांनी आपल्या अखत्यारितील कामाची प्रगती व त्याचे या पुस्तिकेत वेळोवेळी मोजमाप नोंदविणे अपेक्षित असते. बहुतांशी वेळेस ही पुस्तिका काम करणाºया ठेकेदाराच्या ताब्यात सोयीसाठी ठेवली जाते. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाºयाने कार्यारंभ आदेशाप्रमाणे कामकाज झाले किंवा नाही त्याची प्रत्यक्ष स्थळभेट देऊन पाहणी करणे व तशी मोजमाप करून पुस्तिकेत नोंद करणे व या पुस्तिकेतच कामाचे बिल तयार केले जाते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर विभागाच्या अखत्यारित येणाºया नाशिक जिल्ह्णातील दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यात गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या कामाच्या मोजमाप पुस्तिकाच आता सार्वजनिक बांधकाम खात्याला सापडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ही कामे झाली किंवा नाही याचा उलगडा करण्याचे कोणताही महत्त्वाचा पुरावा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सध्या उपलब्ध नसल्याने या कामाचे बिले अदा करण्याचे कामही पूर्णत: ठप्प झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात असलेल्या कागदपत्रांच्या आधारे कार्यकारी अभियंत्यांनी माहिती संकलित केली असता, जवळपास ३३५ कामांच्या मोजमाप पुस्तिका गायब झाल्या असून, संबंधित अधिकाºयांना वारंवार विचारणा करूनही त्यांच्याकडून वा काम करणाºया ठेकेदाराकडून कोणतीही दाद दिली जात नसल्याने या कामांच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा
अनेक वर्षे उलटूनही अभियंत्यांनी कामांच्या मोजमाप पुस्तिका सादर न केल्याने त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांच्याशी पत्रव्यवहार करून पुस्तिका सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत, परंतु त्याला दाद मिळत नसल्याचे पाहून अखेर उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत वृत्तपत्रातून जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून जवळपास ७२ अभियंत्यांच्या नावानिशी यादी व त्यांच्याकडील मोजमाप पुस्तिका क्रमांक जाहीर करून येत्या दहा दिवसांत त्या सादर करण्याचे आवाहन केले आहे. मुदतीत मोजमाप पुस्तिका न आल्यास संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याबरोबरच ज्या कामांच्या मोजमाप पुस्तिका गायब झाल्या आहेत त्या कामांचे देयके अदा न करण्याची भूमिका घेतली आहे. थेट वर्तमानपत्रातूनच अधिकाºयांना जाहीर आवाहन करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम खात्यावर आल्याने या खात्याच्या कारभाराची जाहीर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या साºया प्रकारात अधिकारी व ठेकेदारांचे संगनमत स्पष्ट होत आहे.