प्रशासनाविरोधात ठेकेदार एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 11:06 PM2017-08-10T23:06:25+5:302017-08-11T00:18:15+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी मक्तेदारांच्या विरोधात धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर आता सर्व मक्तेदार एकवटले असून, त्यांनी येत्या २२ आॅगस्टला आमरण उपोषणाची तयारी केली आहे. त्यासाठी १४ आॅगस्टला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी मक्तेदारांच्या विरोधात धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर आता सर्व मक्तेदार एकवटले असून, त्यांनी येत्या २२ आॅगस्टला आमरण उपोषणाची तयारी केली आहे. त्यासाठी १४ आॅगस्टला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी (दि. १०) जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अर्पणा खोसकर यांच्या कक्षात सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना, मजूर सहकारी संस्था संचालक तसेच नोंदणीकृत ठेकेदार यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या पदाधिकाºयांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवर गरमागरम चर्चा झाली. गेल्या चार महिन्यांपासून पैसे मिळत नसल्याने बेरोजगार अभियंते, मजूर संस्था संचालक व नोेंदणीकृत ठेकेदार हवालदिल व कर्जबाजारी झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या कामांसाठी घेतलेले उसनवार साहित्य उदा. सीमेंट, पत्रे, स्टील, वाळू पुरवठादार पैसे नसल्याने सातत्याने त्यांच्या मागे पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने दिलेले धनादेश दोन दिवसात वटण्याची कार्यवाही करावी, अन्यथा कर्जबाजारी ठेकेदारांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या जिवाला काही बरे-वाईट झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनावर राहील, असा निर्वाणीचा इशारा मक्तेदारांनी दिला होता.
जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने न वटलेल्या सुमारे ५७ कोटींच्या धनादेशाच्या चार महिन्यांच्या व्याजासह मक्तेदारांची रक्कम तत्काळ मिळावी, ही प्रमुख मागणी मक्तेदारांची आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीस बेरोजगार अभियंता संघटनेचे संस्थापक योगेश कासार, जिल्हाध्यक्ष आर. टी. शिंदे, कोषाध्यक्ष विनायक माळेकर, सदस्य संदीप वाजे, चंद्रशेखर डांगे, अजित सकाळे, राहुल ढगे, राहुल गांगुली, जिल्हा मजूर संचालक शशिकांत आव्हाड, मजूर संस्था प्रतिनिधी उत्तम बोराडे, आप्पा दराडे आदी उपस्थित होते.