आयटी पार्कला मिळेना ठेकेदार
By admin | Published: May 29, 2016 10:57 PM2016-05-29T22:57:51+5:302016-05-29T22:58:23+5:30
पुन्हा नामुष्की : एकच निविदा प्राप्त
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील आयटी पार्क येथील इमारत चालविण्यासाठी पुन्हा एकदा औद्योगिक विकास महामंडळाच्या पदरी अपयश पडले आहे. मुदतवाढ दिल्यानंतरही आयटी पार्क चालविण्यास देण्यासाठी केवळ एकच निविदा आल्याने आता वेगळा धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
आयटी उद्योग केवल मुंबई, पुण्यापुरती मर्यादित न राहाता नाशिक, औरंगाबाद आणि पुण्यात असे उद्योग यावेत, यासाठी शासनानेच जाणीवपूर्वक नाशिकमध्ये आयटी पार्क सुरू केले. मात्र गेल्या बारा वर्षांपासून या पार्कमध्ये एकही नवीन उद्योग येऊ शकला नाही. बारा वर्षांत तिसऱ्यांदा महामंडळाने या इमारतीसाठी सात कोटी सरकारी किंमत निर्धारित करून देकार मागितले होते. मात्र, २६ एप्रिलपर्यंत म्हणजे विहित मुदतीत एकाच ठेकेदाराने स्वारस्य दाखवले. नियमानुसार किमान तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या तर त्या उघडता येतात. परंतु एकच निविदा आल्याने आणखी स्पर्धा व्हावी यासाठी महामंडळाने १६ मेपर्यंत मुदत वाढवून दिली. परंतु या कालावधीत स्पर्धा वाढेल ही अपेक्षा फोल ठरली. केवळ एकाच ठेकेदाराने निविदा भरल्याने पुन्हा एकदा निविदा मागविण्याची नामुष्की महामंडळावर आली आहे. महामंडळाने इमारत
२ कोटी २३ लाख रुपयांना बांधली असून, त्यावर दरवर्षी दहा टक्के व्याजाची रक्कम लावून ही इमारत सुमारे सात कोटी रुपयांना देण्याची महामंडळाची तयारी आहे. परंतु अशा गोंधळामुळेच कोणीही निविदा भरण्यास तयार नाहीत. ही रक्कम कमी न होता वाढतच चालल्याने कोणीही स्वारस्य दाखविण्यास तयार
नाहीत. (प्रतिनिधी)