अधिकाऱ्याच्या निरोप सोहळ्याला ठेकेदार प्रायोजक?‘ मनसे आक्रमक : चौकशी न झाल्यास आता आंदोलन करणार
By admin | Published: February 3, 2015 12:50 AM2015-02-03T00:50:47+5:302015-02-03T00:51:28+5:30
अधिकाऱ्याच्या निरोप सोहळ्याला ठेकेदार प्रायोजक?‘ मनसे आक्रमक : चौकशी न झाल्यास आता आंदोलन करणार
नाशिक : ओझर विमानतळाच्या पॅसेंजर टर्मिनलच्या आवारात बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांना निरोप देण्यासाठी झालेल्या साग्रसंगीतमय सोहळ्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. या पार्टीचीच नव्हे, तर कार्यक्रमासाठी मद्य परवाना घेणाऱ्या ठेकेदाराने हा खर्च का केला याचा शोध घेण्यासाठी पॅसेंजर टर्मिनलच्या ठेक्याची चौकशी करावी, तसेच संबंधित अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या काळातील आणि त्यांनी नातेवाइकांना दिलेल्या कंत्राटांचीदेखील चौकशी करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. तसे न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता असलेले पी. वाय. देशमुख यांच्या निरोप समारंभासाठी विमानतळाच्या पॅसेंजर टर्मिनलच्या जागेत पार्टी करण्यात आली. संरक्षण खात्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अशा ठिकाणी पार्टी करण्याचा आणि त्यामागील माहिती काढल्यानंतर मनसेने सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांंनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. देशमुख निवृत्त होत असताना, बिरारी नामक ठेकेदाराने त्यासाठी परवानगी घेतल्याचे सांगण्यात आले आहे.