पाणीपुरवठा देयकासाठी ठेकेदाराचा ‘थयथयाट
By admin | Published: December 11, 2015 12:22 AM2015-12-11T00:22:34+5:302015-12-11T00:25:33+5:30
’जिल्हा परिषद : अधिकाऱ्याने केली पोलिसांत तक्रार
नाशिक : पाणीपुरवठा योजनेसंदर्भात देयकाची रखडलेली फाईल निकाली काढण्यासाठी एका ठेकेदाराने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात जोरजोरात बोलत धिंगाणा घातल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी याबाबत भद्रकाली पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे.
बुधवारी दुपारी हा प्रसंग घडला. प्रतिभा संगमनेरे या त्यांच्या कक्षात बसलेल्या असतानाच दिंडोरी तालुक्यातील एक ठेकेदार आला व त्याने पाणीपुरवठा योजनेबाबत रखडलेल्या एका देयकाची फाईल निकाली काढण्याची मागणी केली. याबाबतचे निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी घेत असल्याने त्यांच्याकडे फाईल पाठवून मगच देयके काढण्यात येईल, असे संगमनेरे यांनी संबंधित ठेकेदाराला सांगताच त्याने जोरजोरात बोलत संगमनेरे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. आवाज वाढल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही तिकडे धाव घेतली.
त्यानंतर सायंकाळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला आहे. (प्रतिनिधी)