बंधाऱ्याच्या पाण्यावर पुन्हा ठेकेदाराचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:09+5:302021-03-14T04:14:09+5:30
सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील दुशिंगपूर येथील बंधाऱ्यातील जलसाठ्यावर समृध्दी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने पुन्हा डल्ला मारण्यास ...
सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील दुशिंगपूर येथील बंधाऱ्यातील जलसाठ्यावर समृध्दी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने पुन्हा डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. याला शेतकऱ्यांनी विरोध करूनही तसेच प्रशासनाने समज देऊनही ठेकेदार पाणी उपसा थांबवित नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदाराविरोधात पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सिन्नरच्या पूर्व भागातील सर्वात मोठा तलाव असणारा येथील बंधारा भोजापूरच्या पूरपाण्याने भरून घेण्याची योजना आहे. यापूर्वी केवळ कागदोपत्रीच पूरपाण्याचा लाभ या भागाला मिळत होता. गेल्या वर्षी पावसाची कृपादृष्टी झाल्याने बंधाऱ्यात पहिल्यांदाच पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, बंधाऱ्याच्या मध्यातून समृद्धी मार्ग जाणार असल्याने बंधाऱ्याची साठवण क्षमता घटण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे महामार्गालाच विरोध करण्यात केला होता. मात्र, स्थानिकांचा हा विरोध मोडीत काढून काम सुरू केले आहे.
---------------------------
दिवसाकाठी शेकडो टँकर पाणी उपसा
एवढ्यावरही न थांबता ठेकेदाराने महामार्गाच्या कामासाठी फुकटचे पाणी वापरण्यासाठी या बंधाऱ्यातील जलसाठ्यावर डल्ला मारण्याचे काम सुरू केले. महामार्गाच्या कामासाठी दिवसाकाठी शेकडो टँकर पाणी उपसा करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत प्रशासनाने ठेकेदारास समज देऊन पाणीउपसा त्वरित थांबवण्याची मागणी तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर प्रशासनाने समज दिल्याने ठेकेदाराने बंधाऱ्यातून जलउपसा करण्याचे थाबंविले होते. मात्र, गुरुवारपासून पुन्हा ठेकेदाराने पाणी उपसा सुरू केला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर माजी सरपंच कानिफनाथ घोटेकर यांच्यासह ग्रामस्थांनी प्रत्यक्ष बंधाऱ्यावर जाऊन अवैधरित्या सुरू असलेला पाणी उपसा थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठेकेदाराच्या कामगारांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असून संबंधित ठेकेदारावर पाणीचोरीचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी घोटेकर यांनी केली आहे.
-------------
सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर येथील बंधाऱ्यातून महामार्गाच्या ठेकेदाराकडून अवैध पाणी उपसा केला जात आहे. (१३ सिन्नर २)
===Photopath===
130321\13nsk_19_13032021_13.jpg
===Caption===
१३ सिन्नर २