उड्डाणपुलासाठी शिवसेनेच्या आग्रहामागे ठेकेदाराची रिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:18 AM2021-06-09T04:18:51+5:302021-06-09T04:18:51+5:30
भाजप आणि शिवसेनेत उड्डाणपुलाच्या कामावरून सध्या वादाचे उड्डाण सुरू आहे. पुलाचे काम स्थगित करण्यासाठी सोमवारी (दि.७) भाजपाच्या वतीने आयुक्तांच्या ...
भाजप आणि शिवसेनेत उड्डाणपुलाच्या कामावरून सध्या वादाचे उड्डाण सुरू आहे. पुलाचे काम स्थगित करण्यासाठी सोमवारी (दि.७) भाजपाच्या वतीने आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात येणार होेत. मात्र,त्या आधी भाजप नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृह नेता कमलेश बोडके, गटनेता अरूण पवार, माजी सभापती शिवाजी गांगुर्डे आणि उध्दव निमसे तसेच दिनकर पाटील यांनी आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेच्या उड्डाणपुलामागील आग्रहामागे भलतेच गौडबंगाल असल्याचा आरोप करण्यात आला.
अडीचशे कोटी रूपयांचे सदरचे पुल करण्यास विरोध नाही. मात्र, सध्या नगरसेवकांच्या प्रभागात मुलभूत सेवांची कामे करण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यातच उड्डाण पुल व्हावे या शिवसेनेच्या नगरसेवकाच्या आग्रहाचा हेतु शुध्द नाही. शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने रिंग करून ठेकेदारी हाताळल्याचा आराेप यावेळी करण्यात आला असून काही पुरावे देखील यासंदर्भात मिळाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. सकृत दर्शनी ठेकेदार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतले असल्याचे दिसत आहे. दोन दिवसात यासंदर्भात पुरावे सादर करण्यात येणार असून त्यामुळे पुरावे पडताळून ही दोन्ही कामे रद्द करावीत तसेच यात गुंतलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
इन्फो...
ठेकेदाराला सेना नगरसेवकाने दिली भाड्याची जागा
सिडकोतील उड्डाणपुलाचे काम घेतलेल्या ठेकेदाराचे साहित्य ठेवण्यासाठी शिवसेनेच्या एका नगरसेवकाने आपली जागा भाड्याने दिली असून त्याठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यासह अन्य अनेक कामांचे पुरावे सध्या संकलीत केले जात आहेत. ते देखील आयुक्तांना देण्यात येेणार असल्याचे स्थायी समिती सभापती गणेश गीते व सभागृह नेते कमलेश बोडके यांनी सांगितले.