लग्न सोहळ्यातील उपस्थितीवर नियंत्रण ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:37+5:302021-07-10T04:11:37+5:30
नाशिक : शहरी भागातील कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येपेक्षा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढलेली आहे. विशेषत: ग्रामीण ...
नाशिक : शहरी भागातील कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येपेक्षा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढलेली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील लग्न सोहळ्यांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी निर्बंध नियमांचे काटेकाेर पालन करण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. ग्रामीणस्तरावर काम करणारे तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या मदतीने नियोजन करण्याच्या सूचनादेखील त्यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कोरोना सद्य:स्थिती आणि कोरोनापश्चात आजारांबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, निलेश श्रींगी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढल्याबाबत चिंता व्यक्त करीत त्यांनी निर्बंध नियमांचे पालन करण्यावर भर देण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. ग्रामीण भागात लग्न सोहळ्यांना परवानगी देताना लग्न समारंभासाठी निर्धारित केलेल्या उपस्थितांच्या संख्येचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, तसेच लग्नासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासण्यात यावे, मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य करण्यात यावे, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही भुजबळ यांनी दिल्या. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, त्यातून कोणीही गरजू वंचित राहणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
--इन्फो--
निर्बंध जैसे थे
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या कोरोना निर्बंधात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात आलेली नाही. सध्या सुरू असलेले निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. काेरेानाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असला, तरी पुढील संभाव्य तिसरी लाट आणि नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
--इन्फो
जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी मंजूर करण्यात आलेले सर्व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. हे प्रकल्प सुरू करण्यापूर्वी या प्रकल्पांमध्ये भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत किंवा कमतरता राहणार नाही, यासाठी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून त्यांच्या गुणवत्तेची पडताळणी करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.