लष्करी अळी नियंत्रणासाठी कृषी विभाग सरसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 04:17 PM2019-07-04T16:17:32+5:302019-07-04T16:18:00+5:30
सातारे येथे चर्चासत्र : शेतात जाऊन मका पिकांचे निरीक्षण
जळगाव नेऊर : .येवला तालुक्यातील सातारे येथील शेतकरी अशोक रंगनाथ दखणे यांच्या शेतात मका पिकावरील ‘अमेरिकन लष्करी आळी’ या विषयावर तालुका कृषी अधिकारी येवला यांच्यामार्फत चर्चासत्र व प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष मका पिकाच्या प्लॉटवर घेऊन जात पिकाचे निरीक्षण करण्यात आले. याशिवाय, कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व पिक विमा या विषयावरही सविस्तर मार्गदर्शन केले.
मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर गायके यांनी मका पिकावर येणाऱ्या लष्करी अळीचा जीवनक्र म सांगत नुकसानीबरोबर या किडीची माहिती दिली. तसेच अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण , बियाणे पेरणीपूर्वी देण्याची औषधे, करावयाची उपायोजना यासंदर्भातही सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच मका उगवणीनंतर निंबोळी अर्कची फवारणी, मका पिकात पक्षी थांबे ,लाईट ट्रॅप ,व कामगंध सापळी लावण्यात यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. चर्चासत्रात पाटोदा येथील मंडल कृषी अधिकारी जनार्दन क्षिरसागर यांनी हुमणी किड नियंत्रण याविषयी माहिती दिली. प्रकाश जवणे यांनी प्रास्ताविक केले. भास्कर नाईकवाडे यांनी आभार मानले. या कार्यक्र मासाठी शेतकरी संघटनेचे संतु पाटील पाटील झांबरे, नामदेव गवारे, भाऊसाहेब पठारे ,आप्पासाहेब पठारे, शांताराम पाटील, साईनाथ गचाले, ज्ञानेश्वर गचाले, ज्ञानेश्वर पठारे, दत्तू दखणे, गणपत काळे आदी उपस्थित होते.
असे करा व्यवस्थापन?
१) मका पेरणी करतांना प्रत्येक गावाने सलग एक दोन दिवसातच पेरणी करावी.
२)बिज प्रक्रि या करूनच मका बियाणे पेरणी करावी.
३) ज्या शेतकऱ्यांची पेरणी बाकी आहे किंवा ज्यांनी नुकतीच पेरणी केलेली आहे अशा शेतक-यांनी मका पिकात १० ते १५ओळीनंतर तुर/मुग/उडीद या सापळा पिकाची लागवड करावी.
४) पेरणी झाल्यानंतर ७ ते ८ दिवसांनंतर शेतामध्ये रोज नागमोडी पद्धतीने निरीक्षण करावे, निरीक्षणात पानावर पांढ-या खिडकीच्या आकाराचे पट्टे दिसल्यास किंवा आळीचा प्रादुर्भाव दिसल्यास उपाययोजना कराव्यात.
५) एकरी ४ ते ५ किंवा त्यापेक्षा अधिक पक्षी थांबे उभारावेत किंवा कामगंध सापळे एकरी २ ते ४ याचा वापर करावा.
६) मका पिकावर गुळाची फवारणी करावी ,त्यामुळे मुंगळे हे अंडी व अळ्या नष्ट करतील.
७) आळीचा प्रादुर्भाव जास्त दिसल्यास आळीच्या अवस्थेनुसार रासायनिक औषधांची फवारणी करावी.