आरोग्य विभागात नियंत्रण कक्ष कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 04:58 PM2020-03-30T16:58:51+5:302020-03-30T16:59:06+5:30
कोरोना व्हायरसबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावांमध्ये गर्दीच्या ठिकाणी, मुख्य रस्ते, मोठे बसण्याचे पार, आठवडे बाजाराच्या जागा याठिकाणी सोडियम हायपोक्लोराइडचे द्रावणाची फवारणी करण्यात येत
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागात साथ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, या कक्षामार्फत रात्रंदिवस जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुक्यांतून आरोग्यविषयक माहिती घेण्यात येत आहे.
कोरोना व्हायरसबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावांमध्ये गर्दीच्या ठिकाणी, मुख्य रस्ते, मोठे बसण्याचे पार, आठवडे बाजाराच्या जागा याठिकाणी सोडियम हायपोक्लोराइडचे द्रावणाची फवारणी करण्यात येत असून, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून नियमित उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र कार्यरत असून, आशा, आरोग्यसेवक, सेविकांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच गावांमध्ये आलेल्या बाहेरगावच्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना कोरोनासदृश आजाराची लक्षणे आहेत का? याचा शोध घेतला जात आहे. तसेच गावपातळीवरील संचारबंदीची अंमलबजावणी होते आहे की नाही याबाबत ग्रामपंचायत व आरोग्य विभागामार्फत ठेवण्यात लक्ष ठेवण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर नियमित पाणी शुद्धीकरण करण्याबाबत निर्देश देण्यात आले असून, पाणी स्त्रोतांची स्वच्छता व दररोज टीसीएचद्धारे पाणी शुद्धीकरणे करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सामाजिक संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोशल मीडियाद्वारे जनतेला आवाहन करीत असून, तालुक्यांकडून दररोज गावपातळीवरील उपाययोजनांचा आढावा घेण्यात येत आहे.